भडगाव तालुक्यातील घटनेचा पोलिसांकडून उलगडा, संशयित अटकेत
जळगाव ( प्रतिनिधी ) – पिंपरखेड ता.भडगाव येथे दोन दिवसांच्या अंतराने दोन मृतदेह तलावातून सापडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण होते. सोबतच्या इसमाचा आपल्यामुळे झालेल्या मृत्युचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार वृद्ध आपले नाव सांगतो की काय, या भितीतून त्याच वृद्धाच्या डोक्यात वार करुन त्यालाही त्याच तलावात फेकुन संशयीत पसार झाला. मात्र, पोलिसांच्या तपासाने घटनाक्रमाचा उलगडा करुन संशयीताच्या हाती बेड्या ठोकल्या आहेत.
पिंपरखेड ता.भडगाव शिवारातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समोरील बंधारा वजा तलावात दिनांक १४ नोव्हेंबरला वाल्मीक संजय ह्याळिंगे (वय-२७) याचा मृतदेह तरंगताना दिसला होता. तर पहिल्या मृत्यूची चौकशी सुरू असतानाच रविवार दि.१६ नोव्हेंबरला त्याच तलावात नारायण रामदास ह्याळिंगे (वय- ५३) यांचाही मृतदेह आढळून आला. घडल्या प्रकाराने संपुर्ण ग्रामस्थामध्ये भितीचे वातावरण पसरले हेाते. त्यात नारायण बाबा याच्या डोक्यावर जबर दुखापत करुन नंतर त्यांना पाण्यात फेकल्याचे स्पष्ट दिसत असल्याने संतप्त ग्रामस्थांनी आंदोलनाचा पवित्रा उचलला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य पाहता सोमवारी दिनांक १७ रोजी दुपारी पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी स्वतः भेट देऊन घटनेची माहिती घेतली. गुन्ह्याच्या तपासात स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राहुल गायकवाड, त्यांचे पथक आणि भडगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक महेश शर्मा व त्यांचे पथक तपासात लावण्यात येवुन त्यांना योग्य त्या सुचना पोलिस अधीक्षकांनी दिल्या होत्या. साध्या वेशातील पोलीस गावात प्रत्येकाकडूनच १० नोहेंबर पासुनची माहिती संकलीत करत होते. गावात येणारे रस्ते जाणारे रस्ते, मयतांच्या कामाचे ठिकाण, उठबस, व्यसनांची माहिती आदी संकलीत करण्यात येत होती. त्यात दुसऱ्या घटनेतील मयत वृद्ध त्याचा रहिवास आणि तो, झोपत असलेले ठिकाण हे घटनास्थळाजवळून अवघ्या काही मिटरच्या अंतरावरच असल्याने माहिती घेणारे पोलिसही चक्रावले.
कुठलाच सुगावा लागत नसतांना, आणि माहिती घेण्यामध्ये दोघी घटनांची सरमिसळ होत असल्याने गोंधळाची परिस्थीती रोजच वाढत असताना त्यानंतर गुन्ह्याचा उलगडा करणारा सुगावा सापडलाच. पहिल्या मृत्युच्या घटनेने हा सर्व प्रकार घडल्याचे व त्या मागील संशयीताचे नाव समोर येताच त्याची चौकशी केली.विनोद प्रकाश पाटील (वय-४६) पोलिसांनी याला ताब्यात घेतले.भडगाव पोलिसांना जुमानत नसल्याने त्याचा पाहुणचार केल्यावर त्यांने गुन्ह्याची कबुली देतच घटनाक्रम सांगीतला.
अटकेतील संशयीत विनोद प्रकाश पाटील (वय-४६) आणि वाल्मीक संजय ह्याळींगे यांच्यात वयाचा निम्मे फरक असून दोघेही सोबत कामधंदा करत होते तसेच रात्री एकत्र मद्यपानही करायचे अशी माहिती मिळाली. घटनेच्या रात्री प्रचंड थंडी असल्याने अख्ख गाव झोपून गेले हेाते. त्या वेळेस दोघेही हातभट्टी दारु प्यायले. गावात आल्यावर त्यांना देशीची एक आणखी बॉटलच भेटली, तेही दोघांनी संपवली. तलावच्या काठावर असलेल्या राखेत दोघेही यथेच्छ लोळले. यात दारु डोक्यात गेल्याने वाल्मीकने डोळे फिरवुन दिले. तो, मात्र जिवंत होता. अंगावर पाणी टाकले तर दारुड्या शुद्धीवर येतो. मात्र, या घटनेत विनोद वाल्मीकला पाण्याच्या तलावातच घेवून गेला. दोघांना पोहता येत असले तरी वाल्मीक नशेत गटांगळ्या खात होता. विनोदला त्याला बाहेर काढता आले नाही म्हणून तो, तसास त्याला सोडून निघुन गेला.
हि सर्व घटना जवळच झोपलेल्या नारायण ह्याळींगे या प्रौढाने पाहिली होती.वाल्मीकचा मृतदेह सापडल्यावर पोलिस आपल्याला पकडतील या भितीने विनोदने शुक्रवार दि. १४ रोजी रात्री नारायण ह्याळींगे याच्या डोक्यावर जबर हल्ला करुन त्याला पाण्यात फेकुन दिल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. भडगाव पोलिसात या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल होवुन विनोद प्रकाश पाटिल यास पोलिसांनी अटक केली आहे.









