एरंडोल तालुक्यातील कासोद्यात नागरिकांचा आक्रोश
जळगाव ( प्रतिनिधी ) – नासिक जिल्हयातील डोंगराळे येथील तीन वर्षीय चिमुरड्या बालिकेवर नराधमाने अत्याचार करुन निर्घूणपणे खुन केल्याची राज्याला हादरवून टाकणारी घटना घडली आहे. या घटनेच्या निषेधार्थ कासोदा ता.एरंडोल येथे मोठा निषेध मुकमोर्चा दि.२० रोजी स.१० वाजेला येथील बिर्ला चौकापासून काढण्यात आला.
मुख्य रस्त्यावरुन पोलीस स्टेशनला हा मोर्चा नेण्यात आला,तेथे सपोनि निलेश राजपूत यांना दोन चिमुकलींच्या हस्ते निवेदन देण्यात आले. मोर्चात गावांतील सर्व संवेदनशील नागरीक,सर्व पक्षीय कार्यकर्ते,महिला, सर्वच शाळा,विद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. कुणी बैनर बनवून आणले. कुणी नराधमाला फाशी द्या असे फलक बनवून आणले. तर कुणी काळ्या रंगाच्या रिबीन तोंडाला व हातावर बांधण्याकरिता स्वयंस्फूर्तीतून आणलेल्या होत्या. मुक मोर्चा असल्याने कोणत्याही घोषणा सुचना नव्हत्या,तरी देखील अतिशय शिस्तीत हा मोर्चा होता.









