जळगाव (प्रतिनिधी) :- सध्या सर्वत्र प्रदूषणाची समस्या सर्व दूर वाढलेली आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे आणि इतर कारणांमुळे हे प्रकार होत आहेत. आज बुधवारी दि. १९ रोजी जागतिक दमा आजार जनजागृती दिनानिमित्त विशेष तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. स्वतःच्या शरीराचे प्रत्येकाने काळजी घ्यावी असे आवाहन श्वसन विकार तज्ज्ञ डॉ. स्वप्निल चौधरी यांनी केले आहे.
जागतिक आरोग्य संघटना आणि ग्लोबल पर्यटन ऑफ डिसीज यांच्या अभ्यासानुसार जागतिक स्तरावर लोकसंख्या वाढत असल्यामुळे तसेच प्रदूषण आणि तंबाखूच्या सेवनाने दम्याचा आजार वाढण्याची शक्यता भविष्यात अधिक आहे. नोव्हेंबर महिन्याचा तिसऱ्या बुधवारी हा दिवस साजरा केला जातो. यंदा त्याची थीम “शॉर्ट ऑफ ब्रेथ थिंक सीओपीडी” अशी आहे. सीओपीडी अर्थात दमा आजार हा फुफ्फुस आणि श्वसन मार्गातील श्वासोश्वासाला प्रतिबंधित करतो. या आजारामुळे फुफ्फुसातील वायू मार्ग आणि हवेच्या पिशव्यांमध्ये लवचिकता कमी होते. श्वसन मार्गाचे दाह रुंद होतात. या आजारामुळे विविध प्रकारचे त्रास रुग्णाला होतात.
बराच काळ असलेला खोकला, खोल श्वास घेण्यास त्रास होणे, फुफुसांचे आवाज येणे, दैनंदिन कामे करताना दम लागणे, निळसर त्वचा होणे आदी लक्षणे या आजाराची आहेत. हवेतील विषारी पदार्थ, कामामुळे निर्माण होणारी धूर, धूळ यांच्या संपर्कात येणे, धूम्रपान असे विविध लक्षणे या आजाराचे आहे.
या दिवसानिमित्त बुधवारी दि. १९ रोजी पीएफटी अर्थात पल्मनरी फंक्शन टेस्ट मोफत घेतली जाणार आहे. ही तपासणी शाहूनगर परिसरातील सहयोग रुग्णालयाच्या शेजारी असणाऱ्या क्लिनिकमध्ये डॉ. स्वप्नील चौधरी यांच्याकडे होणार आहे. रुग्णांनी या मोफत तपासणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.









