सुवर्णकार समाजातर्फे मुख्यमंत्री फडणवीसांना निवेदन
जळगाव ( प्रतिनिधी ) – नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगरगाव येथे घडलेल्या अत्यंत अमानुष घटनेने संपूर्ण महाराष्ट्राचे समाजमन हादरले आहे. चार वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या अत्याचार आणि निर्दयी हत्येच्या घटनेबद्दल जळगाव येथील विविध सामाजिक संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या संतापजनक घटनेतील दोषींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, या मागणीसाठी आज दि. १८ रोजी विविध संघटनांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन सादर केले.
जळगाव येथील महाराष्ट्र सुवर्णकार सेना, अहिर सुवर्णकार महिला मंडळ, संत शिरोमणी नरहरी महाराज बहुउद्देशीय संस्था यासह अनेक संघटनांनी एकत्र येत, ही घटना समाजाच्या सुरक्षिततेवर गंडांतर आणणारी असून, समाजमन अस्वस्थ झाल्याची भावना व्यक्त केली. अत्याचार व हत्येचा गुन्हा करणाऱ्या आरोपीला त्वरित अटक करून त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी. या प्रकरणाची जलदगती न्यायालयात सुनावणी करून, अल्पावधीत निकाल जाहीर करावा, पीडित परिवारास शासनामार्फत योग्य आर्थिक मदत, संरक्षण आणि आवश्यक त्या सर्व सुविधा तत्काळ पुरवाव्यात, अशा मागण्या करण्यात आले आहे.

या निवेदनावर हितकारी सभा (खानदेश विभाग, जळगाव), सुवर्णकार कारागीर संघ आणि ऋणानुबंध वधू-वर पालक परिचय समिती यासह अनेक समाजबांधवांच्या सह्या आहेत. या सर्व संघटनांनी शासनाने मागण्या मान्य करून लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा, अशी एकमुखी मागणी केली आहे. आरोपीस शिक्षा नाही झाली तर आंदोलन आणखीन तीव्र केले जाईल असे सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष संजय विसपुते यांनी सांगितले.
या प्रसंगी निवेदनावर अध्यक्ष संजय विसपुते, उपाध्यक्ष विजय वानखेडे, अहिर सुवर्णकार समाज महिला मंडळ अध्यक्षा रंजना वानखेडे, समाजसेविका – वैशाली विसपुते, रुपाली वाघ, मेळावा स्वागत अध्यक्ष रमेश वाघ,मेळावा प्रमुख सुभाष सोनार, नियोजन समिती प्रमुख शरदचंद्र रणधीर,सचिव प्रशांत विसपुते, प्रसिद्धी प्रमुख गोकुळ सोनार, पंकज रणधीर,बबलु बाविस्कर, मनोज बागुल,उमेश विसपुते,शाम भामरे, याच्यासह आदी समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.










