उत्तराखंड राज्यासह ; जळगाव पोलिस वसाहतीत घडला गुन्हा !
जळगाव (प्रतिनिधी) – येथील पोलीस दलातील एका महिला कॉन्स्टेबलच्या १५ वर्षीय मुलीवर तिच्या सैन्य दलातून निवृत्त झालेल्या सावत्र पित्यानेच पाशवी लैंगिक अत्याचार केल्याची मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. उत्तराखंड राज्यासह जळगाव येथील पोलीस वसाहतीतही हा घृणास्पद गुन्हा घडल्याने पोलिस दलासह संपूर्ण जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.
सदर घटनेची तक्रार देण्यासाठी पीडितेची आई आणि सामाजिक कार्यकर्त्या जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गेल्या असता, पोलिसांनी सुरुवातीला टाळाटाळ केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. अखेर, सामाजिक कार्यकर्त्यांच्या पाठपुराव्यानंतर आणि उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर मध्यरात्री उशिरा पोक्सो कायद्यान्वये बलात्काराचा ‘शून्य’ नंबरने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
देवेंद्रसिंग कुवरसिंग जिना (वय अंदाजे ४५, रा. गोधरा हरिपूर, जि. नैनीताल, उत्तराखंड) असे संशयित आरोपीचे नाव आहे. सैन्य दलातून निवृत्त झालेल्या देवेंद्रसिंग याने अंदाजे ३-४ वर्षांपूर्वी जळगाव येथील एका महिला पोलीस कॉन्स्टेबलसोबत सोशल मीडियाद्वारे ओळख झाल्यानंतर तिसरा विवाह केला होता. पीडित १५ वर्षीय मुलगी ही महिला कॉन्स्टेबलच्या पहिल्या पतीपासूनची आहे. मुलीचा सांभाळ व्हावा या हेतूने महिलेने हा विवाह केला असला तरी, सावत्र पित्याच्या मनात मात्र वेगळेच कपट होते.
फेब्रुवारी २०२५ मध्ये नैनीताल येथे असताना संशयित देवेंद्रसिंग याने या १५ वर्षीय मुलीचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ तयार केला. हाच व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने सर्वप्रथम मुलीवर पाशवी लैंगिक अत्याचार केला. बदनामीच्या भीतीने पीडित मुलीने कोणालाही काही सांगितले नाही.
पोलिस वसाहतीतही पुनरावृत्ती
२०२५ ऑगस्ट महिन्यात संशयित देवेंद्रसिंग जिना हा जळगाव येथील पोलिस वसाहतीमध्ये आला होता. येथेही मुलीची आई बाहेर गेली असता त्याने तो व्हिडिओ दाखवून पुन्हा व्हायरल करण्याची धमकी दिली आणि मुलीवर पुन्हा एकदा लैंगिक अत्याचार केला. तसेच, कोणाला सांगितल्यास बरे वाईट करण्याची धमकी दिल्याने मुलगी प्रचंड घाबरलेली होती.
दि. १५ नोव्हेंबर शनिवार रोजी संशयित आरोपी देवेंद्रसिंग आणि त्याची पत्नी (महिला पोलीस कॉन्स्टेबल) यांच्यात काही कारणावरून वाद झाले. या वादातून महिलेने जिल्हापेठ पोलीस स्टेशनला अदखलपात्र तक्रार दाखल केली. याचा राग आल्याने आरोपी देवेंद्रसिंग याने महिलेला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. याचवेळी या महिलेला तिच्या मुलीसोबत देवेंद्रसिंग यांनी केलेल्या कुकर्माची माहिती मिळाली आणि ती हादरून गेली.
तक्रार दाखल करताना सुरुवातीला टाळाटाळ
पीडितेच्या आईने ओळखीच्या सामाजिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन सोमवार, १७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी जिल्हापेठ पोलीस स्टेशन गाठले. मात्र, येथील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तक्रार नोंदवून घेण्यास सुरुवातीला टाळाटाळ केली. “सदर घटना जळगावला घडली काय,” आता घडली का,? असे वारंवार विचारून महिलेला गोंधळात टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला.
अखेर, सामाजिक कार्यकर्त्यांच्या जोरदार पाठपुराव्यानंतर आणि घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे यांनी मध्यरात्रीपर्यंत लक्ष घालून कार्यवाही केली. रात्री ३ वाजेपर्यंत पोक्सो अंतर्गत बलात्काराचा गुन्हा ‘शून्य’ नंबरने दाखल करण्यात आला आहे.
हा गुन्हा जळगावहुन नैनीताल येथे वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. या घटनेमुळे पोलीस दलातील सुरक्षित वातावरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आरोपीवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.









