जळगाव (प्रतिनिधी) – महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या चोरी होण्याचे प्रकार वाढतच चालले असून जळगाव शहरातील नवीन बसस्थानक आवारात बसमध्ये चढणाऱ्या पाचोरा येथील ५८ वर्षीय सुनिता शांताराम चौधरी यांची सुमारे ५० हजार रुपये किंमतीची सोनपोत बसमध्ये चढत असतानाच अज्ञात चोरट्याने चोरून नेली. ही घटना मंगळवारी दुपारी घडली.

पाचोराहून जळगावात उपचारासाठी आलेल्या सुनिता चौधरी यांचा हात फ्रॅक्चर असल्याने त्या फिजिओथेरपीसाठी शहरात आल्या होत्या. उपचारानंतर त्या जळगाव-पाचोरा (क्रमांक MH-19-5191) बसमध्ये चढत असताना बसमध्ये मोठी गर्दी होती. याच गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील अंदाजे ५ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र लांबवले.
बस वावडदा परिसरात पोहोचल्यावर त्यांना सोनपोत चोरी झाल्याचे लक्षात आले. तत्काळ त्यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. तक्रारीवरून अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोहेकॉ प्रदीप पाटील तपास करीत आहेत.









