झेलम एक्सप्रेसने राजस्थानला पळालेल्या तिन तरुणांच्या तावडीतून मुलींची सुटका
जळगाव (प्रतिनिधी) – भडगाव तालुक्यात एकाच गावातून तिन अल्पवयीन मुली आणि तिन तरुण अचानक बेपत्ता झाल्याने निर्माण झालेल्या खळबळीचे अखेर नाट्यमय समाधान झाले आहे. भडगाव पोलिसांनी दाखल केलेल्या दोन स्वतंत्र गुन्ह्यांच्या तपासातून तिनही मुलींना सुखरूप वाचविण्यात पोलिसांना यश आले असून, संबंधित तिनही तरुणांना अटक करण्यात आली आहे.

प्रारंभी पालकांच्या मदतीने बेपत्ता मुलींच्या मित्र-मैत्रीणींसह नातेवाईकांची कसून चौकशी करण्यात आली. या चौकशीत जवळच्या गावातील तिन तरुणही बेपत्ता असल्याचे समोर आले. त्यांचे मोबाईल स्विच ऑफ असल्याने तपास अधिक गंभीर बनला होता. यानंतर पोलिसांनी दोन पथके नियुक्त करून शोधमोहीम सुरू केली. एक पथक चाळीसगावकडे तर दुसरे पथक जळगावच्या दिशेने रवाना झाले.
जळगावातील पथकाने रेल्वे स्टेशन परिसरातील सिसीटीव्ही फुटेज तपासले असता, २० ऑक्टोबरच्या रात्री तिनही तरुण आणि मुली तिकीट खिडकीवर दिसल्याचे स्पष्ट झाले. त्या वेळेस ये-जा करणाऱ्या गाड्यांची चौकशी केली असता, सर्वजण झेलम एक्सप्रेसने प्रवास केल्याचे समोर आले. यानंतर मुलांच्या नातेवाईकांकडून राजस्थानमधील संभाव्य थांबे आणि निवासस्थाने याबाबत माहिती गोळा करून पुढील तपासाला वेग देण्यात आला.
त्या अनुषंगाने रोशन उर्फ श्रावण धनगर मालचे, अजय सुकलाल देवडे आणि अमोल इश्वर सोनवणे या तिनही तरुणांना राजस्थान राज्यातील अलवर जिल्ह्यातून अटक करण्यात आली. त्यांच्या तावडीतून तिनही अल्पवयीन मुलींची सुखरूप सुटका करण्यात पोलिसांना यश मिळाले.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश शर्मा, पो.उ.नि. सुशिल सोनवणे तसेच पथकातील अन्य अधिकारी-कर्मचारी यांनी संयुक्तपणे केली.









