नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – गेल्या काही दिवसांपासून भारत – चीन सीमेवरील लडाख येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन देशांमधील तणाव निवळावा यासाठी सध्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या बैठका सुरु आहेत.
या वादावर चर्चेतून तोडगा निघेल असे दोन्ही बाजूंकडून सांगण्यात येतंय. अशातच आज एमआयएम पक्षाचे नेते असादुद्दीन ओवैसी यांनी भारत – चीन सीमेवर सुरु असलेल्या तणावावरून केंद्र सरकारला चीनने आपला प्रदेश बळकावला आहे का? आणि बळकावला नसेल तर त्यांच्यासोबत नेमकी कोणती चर्चा सुरु आहे? असे प्रश्न विचारले आहेत.
एका वृत्तसंस्थेशी बोलताना ओवैसी यांनी, ‘चीनने जर आपला प्रदेश बळकावला नसेल, तर सरकार त्यांच्यासोबत कशाबाबत चर्चा करतंय? सरकारने देशाला याबाबतची माहिती द्यायला हवी. केंद्र सरकारने याबाबत खुलासा करायला हवा. सरकार शांत का आहे?,’ असे प्रश्न उपस्थितीत केले.
यावेळी बोलताना ओवैसी यांनी देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या तीन लाखांवर गेल्याबाबत चिंता व्यक्त करताना सरकारचा देशव्यापी लॉक डाऊन पूर्णपणे अपयशी ठरल्याचे म्हंटले. कोरोनाबाबत गुजरातची परिस्थितीही खराब असल्याचं त्यांनी निदर्शनास आणून दिलं.