दहशतवाद्यांच्या ‘डॉक्टर’ नेटवर्कचा पर्दाफाश
नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) दिल्लीतील स्फोटानंतर देशभरात खळबळ माजली आहे. या स्फोटांचे धागेदोरे केवळ दिल्लीपुरते मर्यादित नसून, देशातील अनेक मोठी शहरे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर होती, असा धक्कादायक खुलासा आता समोर येत आहे. मात्र, जम्मू आणि काश्मीरमधील एका डॅशिंग आयपीएस अधिकाऱ्याच्या सतर्कतेमुळे दहशतवाद्यांचा मोठा कट उधळला गेला आणि देशातील अनेक शहरे सुरक्षित राहिली.


काही दिवसांपूर्वी दिल्लीतील लाल किल्ला परिसरात कारमध्ये स्फोट झाला. सरकारने याला दहशतवादी हल्ला घोषित केले. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी ६ डिसेंबर रोजी अयोध्या आणि देशातील इतर महत्त्वाच्या शहरांमध्ये बॉम्बस्फोट घडवण्याचा मोठा मनसुबा रचला होता. धक्कादायक म्हणजे, या कटामागे व्हाईट कॉलर (उच्चभ्रू) डॉक्टर्सचे एक दहशतवादी नेटवर्क कार्यरत होते.या संपूर्ण कटाचा पर्दाफाश होण्यात श्रीनगरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक (SSP) डॉ. जीवी संदीप चक्रवर्ती यांची भूमिका अत्यंत निर्णायक ठरली. १७ ऑक्टोबर रोजी जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील नौगाम येथे उर्दू भाषेत जैश-ए-मोहम्मदचा कमांडर हंजलाच्या नावाने एक पोस्टर लावण्यात आले होते. हे पोस्टर सुरुवातीला अगदी साधं वाटत होतं, पण आयपीएस डॉ. जीवी संदीप चक्रवर्ती यांना ते खटकले आणि त्यांना लगेचच हा एका मोठ्या कटाचा भाग असल्याची शंका आली.
’ऑपरेशन महादेव’चे नेतृत्व करणारे दहशतवाद्यांचे काळ
काश्मीर खोऱ्यात डॉ. जीवी संदीप चक्रवर्ती हे दहशतवाद्यांचा काळ म्हणून ओळखले जातात. त्यांनी यापूर्वी ‘ऑपरेशन महादेव’चे यशस्वी नेतृत्व केले आहे. या शंकेमुळे, जीवी संदीप यांनी जैशचे हे पोस्टर कोणी लावले याचा तातडीने तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, यामागे तीन डॉक्टरांची नावे समोर आली. यापैकी काहींचा पूर्वी दगडफेकीतही समावेश असल्याचे आढळले. पोलिसांनी तत्काळ एका संशयित डॉक्टराला अटक केली आणि त्यानंतर दहशतवादी नेटवर्कचे जाळे उलगडले गेले!
२९०० किलो स्फोटके जप्त, अनेक शहरे वाचवली
पोलिसांनी जैश-ए-मोहम्मदच्या या दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला, ज्यात काश्मीरमधील अनेक डॉक्टरांचा सहभाग होता. या तपासानंतर पोलिसांनी फरीदाबाद आणि इतर परिसरांतून तब्बल २९०० किलो स्फोटके आणि बॉम्ब तयार करण्याचे साहित्य, तसेच रायफल्स जप्त केले.
१० नोव्हेंबरच्या स्फोटानंतर आता या सर्व घटनांची साखळी जोडली जात आहे. परंतु, आयपीएस अधिकारी जीवी संदीप चक्रवर्ती यांनी वेळेवर घेतलेल्या एका निर्णयामुळे देशातील अनेक शहरांना लक्ष्य करण्याचा दहशतवाद्यांचा क्रूर कट उधळला गेला.
वर्दीतील डॉक्टर, दहशतवाद्यांवर भारी
डॉ. जीवी संदीप चक्रवर्ती हे आंध्र प्रदेशातील कुरनूलमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबातून येतात. त्यांचे वडील सरकारी रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी तर आई आरोग्य विभागात कार्यरत होती. वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर २०१४ मध्ये त्यांनी भारतीय पोलीस सेवेत (IPS) प्रवेश केला. वर्दीतील हा डॉक्टर आज दहशतवाद्यांवर काळ बनून भारी पडला आहे.









