दोन आमदारांच्या कुटुंबातच सत्ता, निष्ठावान कार्यकर्ते नाराज
पाचोरा ( विशेष प्रतिनिधी ) – पाचोरा नगरपरिषद निवडणुकीत यंदा नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांसाठी विद्यमान आणि माजी आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी देण्यात आल्याने ‘घराणेशाही’चा मुद्दा ऐरणीवर आला आहे. शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप या दोन्ही प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी आपली पत्नी आणि मुलांसाठी उमेदवारी घेतल्याने, सामान्य आणि निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरल्याची कुजबुज शहरात सुरू आहे.

थेट लढत: पाटील विरुद्ध वाघ कुटुंब
पाचोरा नगरपरिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी थेट दोन राजकीय कुटुंबात लढत होणार आहे. शिवसेना (शिंदे गट): विद्यमान आमदार किशोर पाटील यांनी आपली पत्नी सुनीता किशोर पाटील यांना लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दिली आहे. त्याचबरोबर, त्यांचा मुलगा सुमित पाटील यांना प्रभाग क्रमांक ९ मधून नगरसेवकपदासाठी रिंगणात उतरवले आहे.
भारतीय जनता पक्ष (भाजप): त्यांच्या विरोधात माजी आमदार दिलीप वाघ यांच्या पत्नी सुचिता दिलीप वाघ लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी भाजपच्या वतीने उभ्या आहेत. वाघ यांनी देखील आपला मुलगा भूषण वाघ याला प्रभाग क्रमांक १ मधून, तर पुतण्या सुरज वाघ याला प्रभाग क्रमांक १० मधून नगरसेवकपदासाठी उमेदवारी दिली आहे.
कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची ‘कुजबुज’
दोन्ही बाजूच्या राजकीय पदाधिकाऱ्यांनी विधानसभा सदस्यत्वानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थेतील सर्वात मोठे पद देखील आपल्याच घरात ठेवण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. यामुळे दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते कमालीचे नाराज झाले आहेत.
कार्यकर्त्यांच्या गोटात सुरू असलेल्या चर्चेनुसार, “आमदारकी आली म्हणजे यांच्या घरात आणि आता नगरपरिषद निवडणूक आली म्हणजे मोठे पद परत यांच्याच घरात. सर्वसामान्य कार्यकर्त्याला केवळ पक्षाचे काम करायचे आणि मतांसाठी राबायचे का?” असा संतप्त सवाल विचारला जात आहे.
कार्यकर्त्यांमध्ये अशी भावना आहे की, आमदारांना आमदारकीसह नगराध्यक्षपदही कुटुंबातच हवे आहे. यामुळे अनेक निष्ठावान कार्यकर्त्यांच्या संधींवर पाणी फेरले गेले आहे. “मतदारांनी अशा घराणेशाहीला मूठमाती देत आपली जागा दाखवावी. आमदारकीसह नगराध्यक्षपदही एकाच घरात देणे योग्य नाही.”
या निवडणुकीत दोन्ही आमदारांनी घराणेशाहीला महत्व दिल्याचे चित्र स्पष्ट असून, आता पाचोरा शहराचे मतदार या ‘कौटुंबिक राजकारणा’वर काय निर्णय देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिंदे सेने सह भाजपा ने आपले उमेदवार आधीच जाहीर केले असुन महाविकास आघाडीचा उमेदवार चे नाव गुलदस्त्यात ठेवले आहे. ? जनतेतुन उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.









