भुसावळ रेल्वे विभागाच्या विशेष तिकीट तपासणी मोहिमेला मोठे यश
भुसावळ ( प्रतिनिधी ) – विनातिकीट आणि अनियमित प्रवाशांना आळा घालण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून राबवण्यात आलेल्या विशेष तिकीट तपासणी मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. या मोहिमेदरम्यान भुसावळ रेल्वे विभागाने केवळ सात महिन्यांत तब्बल सहा लाख सात हजार प्रवाशांकडून ५१ कोटी रुपयांचा दंड वसूल केल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

एप्रिल ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत भुसावळ विभागात तिकीट तपासणी पथकांनी विनातिकीट, अयोग्य तिकिटासह किंवा अनियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरुद्ध मोहीम हाती घेतली होती. यात ६३ हजार विनातिकीट प्रवाशांकडून ६ कोटी ९० लाख रुपये, तर ४४ हजार अनियमित प्रवाशांकडून ३ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला. तसेच नोंदणीकृत नसलेल्या साहित्यासाठी ५३ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला.
ही मोहीम विभागीय रेल्वे व्यवस्थापक पुनीत अग्रवाल, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक अजय कुमार आणि सहायक वाणिज्य व्यवस्थापक पी. के. सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली. ऑक्टोबर महिन्यातच एक लाख प्रवाशांकडून ९ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
रेल्वे प्रशासनाने सांगितले की, या मोहिमेमुळे विभागाच्या महसुलात वाढ झाली असून प्रवाशांमध्ये वैध तिकीट घेऊन जबाबदारीने प्रवास करण्याची जाणीव निर्माण होत आहे. पुढील काळातही अशा तपासण्या सातत्याने सुरू ठेवून फुकट्या प्रवाशांवर अधिक कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.









