चोपडा (प्रतिनिधी) – जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात आज मोठी उलथापालथ झाली आहे. विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निष्ठावान ज्येष्ठ नेते अरुणभाई गुजराथी यांनी आपला राजकीय पवित्रा बदलत शरद पवार गटाला सोडचिट्टी देऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश केला आहे.

मुंबईतील महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सभागृहात आज सायंकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
या कार्यक्रमाला मंत्री माणिकराव कोकाटे, आमदार अनिल पाटील, नरवर झिरवळ, धनंजय मुढे, प्रदेश प्रवक्ते सुरज चव्हाण, मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे, प्रतिभाताई शिंदे, तसेच जिल्हाध्यक्ष संजय पवार आणि रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यकर्त्यांचे हित साधण्यासाठी निर्णय — अरुणभाई गुजराथी
राज्यातील सत्तासमीकरणांच्या पार्श्वभूमीवर गुजराथींचा हा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे. एकेकाळी शरद पवार यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे गुजराथी यांनी पक्ष बदलण्यामागील कारण स्पष्ट करताना पत्रकारांशी संवादात सांगितले की, “हा निर्णय मी माझ्या कार्यकर्त्यांच्या हिताचा विचार करून घेतला आहे. आजच्या राजकीय परिस्थितीत विकास आणि स्थैर्यासाठी अजितदादा पवार यांच्यासोबत जाणेच योग्य ठरेल. त्यांच्या कामगिरीत आणि विकासाभिमुख दृष्टिकोनात मला विश्वास वाटतो.”

या प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “मी एवढा मोठा नाही की तुमच्या गळ्यात पटका टाकेन; राज्यात तुम्ही जबाबदारी सांभाळा.” त्यांनी अरुणभाई गुजराथी यांच्या प्रवेशामुळे पक्षाला उत्तर महाराष्ट्रात मोठे बळ मिळेल, असे सांगत त्यांच्या दीर्घ अनुभवाचा फायदा पक्ष संघटनेला होईल, असा विश्वास व्यक्त केला.

उत्तर महाराष्ट्रात अजित पवार गटाला नवे बळ
चोपडा शहरासह परिसरातील शेकडो कार्यकर्त्यांनी अरुणभाई गुजराथी यांच्यासोबत अजित पवार गटात प्रवेश केला. या प्रवेशामुळे जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकीय समीकरणांमध्ये मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे आहेत. राजकीय निरीक्षकांच्या मते, गुजराथींचा हा प्रवेश अजित पवार गटासाठी उत्तर महाराष्ट्रात मनोबलवर्धक ठरणार असून शरद पवार गटासाठी मात्र मोठा धक्का मानला जात आहे.
या प्रवेशानंतर जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे राजकारण नव्या दिशेने वळण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.









