विकास आणि स्थिर सत्तेसाठी द्विपक्षीय युती; राष्ट्रवादी काँग्रेसकडून ठोस प्रस्ताव नसल्याचे स्पष्टीकरण
पारोळा (प्रतिनिधी) – आगामी पारोळा आणि एरंडोल नगरपरिषद निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना यांनी एकत्र येत युतीची अधिकृत घोषणा केली आहे. मात्र, या युतीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला डावलण्यात आले असून, यामुळे स्थानिक राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

युतीची अधिकृत घोषणा
आज पारोळ्यात आयोजित पत्रकार परिषदेत भाजपचे आमदार मंगेश चव्हाण आणि शिंदे गटाचे आमदार अमोल पाटील यांच्या उपस्थितीत ही युती जाहीर करण्यात आली. दोन्ही नेत्यांनी स्पष्ट केले की, पारोळा-एरंडोल मतदारसंघातील विकासाला गती देण्यासाठी आणि शहरांमध्ये स्थिर सत्ता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
“राज्याच्या आणि जिल्ह्याच्या विकासात पारोळा-एरंडोल परिसराची भूमिका महत्त्वाची आहे. विकासाच्या अजेंड्यावर आम्ही एकत्र आलो आहोत. आमच्या युतीचा उद्देश केवळ सत्ता नव्हे, तर नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करणे हा आहे.”आमदार मंगेश चव्हाण, यांनी यावेळी सांगितले
अजित पवार गटाला डावलण्याचे कारण
युतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला वगळण्याबाबत विचारले असता, आमदार अमोल पाटील यांनी महत्त्वपूर्ण खुलासा केला. ते म्हणाले की, युती संदर्भात राष्ट्रवादीकडून कोणताही ठोस प्रस्ताव आलेला नव्हता. त्यामुळे या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी द्विपक्षीय स्वरूपातच रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
तसेच नगराध्यक्षपदाचे वाटप दोन्ही पक्षांमध्ये निश्चित झाले आहे: एरंडोल नगराध्यक्षपद: भारतीय जनता पक्षाकडे (भाजप) तर पारोळा नगराध्यक्षपद: शिवसेना (शिंदे गट) कडे राहणार आहे. तर या वाटपावर दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेतृत्वांमध्ये सहमती झाल्याचे दोन्ही आमदारांनी स्पष्ट केले.
राजकीय समीकरणे बदलली
या युतीमुळे पारोळा आणि एरंडोलमधील राजकीय समीकरणांना नवा कलाटणी मिळाली आहे. भाजप आणि शिंदे गटाच्या एकत्रीकरणामुळे विरोधकांसाठी ही निवडणूक अधिक आव्हानात्मक ठरणार आहे. आगामी दिवसांत उमेदवारांच्या निवडीसाठी संयुक्त बैठक होणार असून, दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते युतीसाठी सज्ज झाले आहेत.









