मोटारसायकलस्वाराचा जागीच मृत्यू
चाळीसगाव (प्रतिनिधी) – धुळे – चाळीसगाव राष्ट्रीय महामार्गावर भोरस गावाजवळ आज दुपारी सुमारास झालेल्या भीषण अपघातात पिराचे बोरखेडा येथील भागवत पाटील या मोटारसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला. दुपारी साधारण १ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला असून, ट्रक (क्रमांक HR 74 BO 450) ने मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.

धडकेनंतर मोटारसायकल ट्रकच्या पुढील भागात अडकून अक्षरशः चिरडली गेली. अपघात इतका भीषण होता की भागवत पाटील यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेनंतर काही वेळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
स्थानिक नागरिकांनी तत्काळ चाळीसगाव ग्रामीण पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न केले आणि मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात हलवला. अपघाताचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून, या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.









