दोन तलाठ्यासह तिघे निलंबित, कोतवाल अटकेत

ही कारवाई आमदार चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या तक्रारीनंतर करण्यात आली. आमदार पाटील यांनी अनुदान वितरण प्रक्रियेत लाखो रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप करत संबंधित कागदपत्रांसह पुरावे महसूल प्रशासनास सादर केले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी घुगे यांनी विशेष चौकशी समिती नेमून प्रकरणाची सखोल चौकशी केली. चौकशी अहवाल प्राप्त होताच सोमवारी तातडीने तिन्ही अधिकाऱ्यांविरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली.
निलंबितांमध्ये बोरखेडा (ता. मुक्ताईनगर) येथील तलाठी महेंद्र वंजारी, उंचदा येथील तत्कालीन तलाठी कृष्णकुमार ठाकूर (सध्या पारोळा येथे कार्यरत) आणि मुक्ताईनगर तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक मनीष बेंडाळे यांचा समावेश आहे. तसेच उंचदा येथील कोतवाल राहुल सोनवणे याला ९ नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या डीबीटी प्रणालीद्वारे थेट खात्यावर मदत दिली जात होती. मात्र काही कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या नावाने बनावट नोंदी करून अनुदानाची रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वळविल्याचे समोर आले आहे.
प्रकरण समोर आल्यानंतर जिल्हाधिकारी घुगे यांनी महसूल विभागातील पारदर्शकता आणि शेतकऱ्यांचा विश्वास टिकवण्यासाठी कठोर पावले उचलली. या कारवाईनंतर महसूल विभागात मोठी खळबळ उडाली असून संबंधित प्रकरणाची पुढील चौकशी सुरू आहे.









