पुणे (वृत्तसंस्था) – जिल्ह्यात मान्सून हंगाम सुरू होत असून या काळात मावळ, मुळशी, हवेली, आंबेगाव, जुन्नर, भोर आणि वेल्हा तालुक्यात मोठ्या प्रमाणात वर्षा पर्यटनासाठी नागरिक येतात. याबरोबरच ताम्हीणी घाट, भिमाशंकर, माळशेट घाट, गडकिल्ले या परिसरामध्ये देखील पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. सध्या असलेले करोनाचे संकट आणि हवामानाचा अंदाज लक्षात घेता पुणे जिल्ह्यात वर्षा पर्यटनासाठी नागरिकांना बंदी घालण्याचे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी काढले आहेत.
सध्या नागरिकांना वर्षा पर्यटनाचे वेध लागले आहेत. परंतु सध्या पुणे-मुंबईसह संपूर्ण राज्यावर करोनाचे संकट असून, या भागातील नागरिक मोठ्या प्रमाणात पर्यटनासाठी ग्रामीण भागात जातात. धरण परिसरामध्ये पर्यटन करताना अनेक पर्यटकांचे पाण्यामध्ये बुडून मृत्यू देखील झाले आहेत. यामुळे भविष्यात कोणत्याही स्वरूपाची आपत्ती, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यामुळे जिल्हाधिकारी राम यांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्याअतंर्गत जिल्ह्यात वर्षा पर्यटनासाठी नागरिकांना बंदी घातली आहे.
दरम्यान, बंगालच्या उपसागरात तयार होत असलेले कमी दाबाचे क्षेत्र मान्सूनच्या वाटचालीस पूरक ठरण्याचे संकेत आहेत. त्यामुळे मान्सून मंगळवारपर्यंत तळकोकणात दाखल होण्याची शक्यता आहे.
रविवारी मान्सूनने तामिळनाडूचा बहुतांशी भाग, अंतर्गत कर्नाटकचा काही भाग आणि आंध्र प्रदेशाच्या रायलसिमा भागात प्रगती केल्याचे हवामान विभागान जाहीर केले.