दोन संशयित ताब्यात, पाकिटचोरीचा धागा उलगडला
भुसावळ ( प्रतिनिधी ) – रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सुरू असलेल्या ‘ऑपरेशन यात्रि सुरक्षा’ अंतर्गत भुसावळ रेल्वे स्थानकावर आरपीएफच्या गुन्हे रोख पथकाने संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या दोन व्यक्तींना ताब्यात घेतले असून, चौकशीत पाकिटचोरीचा धागा उलगडला आहे.
आरपीएफकडून मिळालेल्या माहितीनुसार, कर्मचारी देवेंद्र दीक्षित व पंकज राऊत हे भुसावळ स्टेशन परिसरात नियमित गस्त घालत असताना प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर दोन व्यक्तींच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. त्यांना थांबवून विचारपूस केली असता ते समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत, त्यामुळे त्यांना आरपीएफ ठाण्यात आणण्यात आले. चौकशीत दोघांनी झेलम एक्स्प्रेसच्या ए-१ कोचमधील एका प्रवाशाचे पाकीट चोरल्याची कबुली दिली. मात्र, पाकिटात मौल्यवान वस्तू नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी ते फेकून दिल्याचेही सांगितले.
दोन्ही संशयितांना पुढील कारवाईसाठी जीआरपी (रेल्वे पोलिस) भुसावळ यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या कारवाईमुळे आरपीएफच्या सतर्कतेचा आणि तत्परतेचा प्रत्यय पुन्हा एकदा आला असून, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी स्टेशन परिसरात गस्त आणि तपासणी अधिक कडक करण्यात आली आहे.









