१४५ प्रकरणांवर कारवाई, दीड लाखांहून अधिक दंड वसूल
भुसावळ ( प्रतिनिधी ) – नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी भुसावळ पोलिसांकडून शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत विशेष नाकाबंदी आणि ‘कोम्बिंग ऑपरेशन’ राबविण्यात आले. शहरातील प्रमुख चौक, गर्दीचे मार्ग तसेच संवेदनशील भागांत पोलिस पथके तैनात करून वाहन तपासणी, संशयितांची चौकशी आणि वॉरंट बजावणीची मोहीम हाती घेण्यात आली.
या कारवाईदरम्यान वाहतूक नियमांचे उल्लंघन, परवान्याविना वाहन चालविणे, हेल्मेट न वापरणे अशा १४५ प्रकरणांवर एमव्ही अॅक्ट अंतर्गत कारवाई करण्यात येऊन एकूण ₹१,५२,००० इतका दंड जागेवरच वसूल करण्यात आला. ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’ची ८ प्रकरणे, मटका-जुगारावरील ४ कारवाया, दारूबंदी उल्लंघनाची ७ प्रकरणे, एनबीडब्ल्यू वॉरंट बजावणीची ११, बीडब्ल्यू वॉरंट बजावणीची १३ तर पीटा कायद्यान्वये १ गुन्हा नशिराबाद पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आला. संबंधित आरोपींना पोलिसांनी त्यांच्या घरी जाऊन अटक वॉरंट बजावून प्रत्यक्ष अटक केली.
शहरातील यावल नाका, बसस्थानक, नाहाटा चौफुली, खडका रोड, जामनेर रोड आदी ठिकाणी विशेष नाकाबंदी करण्यात आली. पोलिसांनी वाहनांची तपासणी, कागदपत्रांची पडताळणी करत बाहेरून येणाऱ्या वाहनांवर विशेष लक्ष ठेवले. इराणी परिसर, जाममोहल्ला, तसेच संवेदनशील भागात घराघरांत जाऊन संशयितांची तपासणी करण्यात आली.
रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या ‘कोम्बिंग ऑपरेशन’ दरम्यान निर्जन रस्ते, व्यापारी भाग आणि ओस पडलेल्या गल्लीबोळांची सखोल पाहणी करण्यात आली. पोलिसांच्या याद्यांवरील गुन्हेगार, संशयित आणि वारंवार गुन्हे करणाऱ्यांवर काटेकोरपणे कारवाई करण्यात आली.









