जळगाव ( प्रतिनिधी ) – सोशल मीडियावर ‘घरबसल्या कमाई’चे स्वप्न दाखवून सायबर भामट्यांनी जळगावातील एका महाविद्यालयीन लिपिकाला तब्बल ३ लाख ६० हजार रुपयांनी लुटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ‘व्हिडिओ लाईक करा आणि पैसे मिळवा’ या आमिषाने सुरू झालेली ही फसवणूक अखेरीस ‘क्रिप्टोकरन्सी टास्क’च्या नावाखाली मोठ्या आर्थिक नुकसानात परिवर्तित झाली. या प्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात सायबर ठगांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानदेव नगर परिसरात राहणारे रमेश सोनार (वय ४५) हे शहरातील एका महाविद्यालयात लिपिक म्हणून कार्यरत आहेत. दि. ५ ऑक्टोबर रोजी त्यांना ‘टेलिग्राम’ ॲपवरून एका अज्ञात व्यक्तीचा संदेश आला. त्या संदेशात ‘व्हिडिओ आणि फोटो लाईक केल्यावर प्रत्येक लाईकवर ₹१०० मिळतील’ असे सांगण्यात आले होते. सुरुवातीचे काही ‘टास्क’ पूर्ण केल्यानंतर सोनार यांच्या खात्यात ₹६६० जमा झाले. त्यावर विश्वास बसल्याने त्यांनी पुढील टप्प्यात सहभाग घेतला.
यानंतर ठगांनी त्यांना ‘क्रिप्टोकरन्सी’ आणि ‘बिटकॉइन टास्क’मध्ये सहभागी होण्यास सांगून मोठ्या नफ्याचे आमिष दाखवले. ‘₹२८ हजार भरल्यास ₹४२ हजार मिळतील,’ असे सांगत त्यांना क्रमाक्रमाने अधिक पैसे गुंतवण्यास प्रवृत्त केले. या प्रलोभनाला भुलून सोनार यांनी आपल्या बँकांच्या क्रेडिट कार्डांचा वापर करून विविध खात्यांमध्ये एकूण ३ लाख ६० हजार रुपये ट्रान्सफर केले.
मात्र, दि. ८ ऑक्टोबर रोजी जेव्हा त्यांनी ‘मिन्ट’ नावाचे खाते तपासले, तेव्हा नफ्याऐवजी खात्यात दीड लाख रुपयांचा तोटा झालेला दिसला. त्यांनी याबाबत चौकशी केली असता, ‘डेटा रिपेअर’साठी आणखी दीड लाख रुपये भरण्याची मागणी करण्यात आली. यानंतर त्यांना आपल्या फसवणुकीची जाणीव झाली आणि त्यांनी तत्काळ शनिपेठ पोलिसांकडे धाव घेतली.
दि. ६ नोव्हेंबर रोजी रमेश सोनार यांच्या फिर्यादीवरून अज्ञात सायबर गुन्हेगारांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास सायबर पोलिसांकडून सुरू असून, नागरिकांनी अशा प्रकारच्या ‘ऑनलाईन टास्क’ किंवा ‘सोशल मीडिया कमाई’च्या संदेशांपासून सावध राहावे, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.









