जळगाव ( प्रतिनिधी ) : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे आयोजित एकविसाव्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ इंद्रधनुष्य युवक महोत्सवात विद्यार्थ्यांनी विविध कला प्रकार सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. भारतीय लोकसंगीत वाद्यवृंद, भारतीय समूह गान, पाश्चिमात्य गायन, पाश्चिमात्य वाद्य संगीत, एकांकिका, वक्तृत्व स्पर्धा, मातीकला, कोलाज आणि रांगोळींच्या माध्यमातून तरूणाईने सर्जनशीलतेच्या कलाविष्कारांची उधळण केली.विद्यापीठ परिसरात विविध ठिकाणी सहभागी विद्यार्थी, कलावंत स्पर्धेच्या पूर्व तयारीसाठी रंगीत तालीम करीत असतांना दिसत होते त्यामुळे जणू विद्यापीठात इंद्रधनुष्याच्या रंगांची उधळण होत असल्याचे येवू लागले.
जळगाव जिल्ह्याच्या ऐतिहासिक व भौगोलिक माहितीचे प्रदर्शन
इंद्रधनुष्य महोत्सवाच्या निमित्ताने राज्यभरातील २४ विद्यापीठातील आलेल्या विद्यार्थ्यांना जळगाव जिल्ह्याच्या ऐतिहासिक आणि भौगोलिकतेसंदर्भात माहिती व्हावी यासाठी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर फलकाद्वारे प्रदर्शन लावण्यात आले आहे. जळगाव जिल्ह्यात ठसा उमटविणारे पुज्य साने गुरूजी, कवी केशवसूत, धनाजी नाना चौधरी, कवयित्री बहिणाबाई चौधरी, अण्णासाहेब डॉ. जी.डी. बेंडाळे, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, पद्मश्री कवी ना.धो. महानोर, पद्मश्री भवरलालजी जैन, ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे, शितल महाजन यांच्या कार्याच्या माहितीचे फलक तसेच पर्यटन असलेले वालझरी, उनपदेव, अमळनेर, पाटणादेवी,पितळखोरे, फरकांडे, संत मुक्ताबाई, कन्हेरगड, चांगदेव, बहाळ टेकवाडे, भुईकोट किल्ला तसेच खान्देशातील लोकपरंपरे बाबतच्या माहितीचे फलक सुध्दा लक्ष वेधून घेत होते. राज्यातील अनेक विद्यार्थी फलकावरील माहितीचे अवलोकन व वाचन करून तसेच आपल्या मोबाईलच्या कॅमेरात कैद करून जळगाव जिल्ह्याच्या ऐतिहासिक व भौगोलिक माहिती जिज्ञासापूर्वक आत्मसात करतांना दिसून येत होते.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात सुरू असलेल्या इंद्रधनुष्य महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजेपासून वेगवेगळ्या कलांची सादरीकरण झाले. रंगमंच क्रमांक १ बंकिमचंद्र चटोपाध्याय सभागृहात दि. ५ नोव्हेंबर रोजी दुपारी झालेल्या भारतीय लोकसंगीत वाद्यवृंद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कलाप्रकारात एकुण १३ संघांनी सहभाग नोंदविला होता. यात बासुरी, ढोल, तबला, ढोलकी, झांज, हलकी, संबल, ताशा, सनई मृदुंग, पखवाज, खंजिरी, घुंगरू, हार्मोनियम, तुतारी, शंख,दिमडी, पुणेरी ढोल ताशा, रामढोल,चिपळया, तुणतुणी यासह अनेक वाद्यवृंद सादर करीत विद्यार्थ्यांनी दाद मिळवली आपल्या विविध वाद्यवृंदांनी व सादरीकरणांनी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे दि. ६ नोव्हेंबर रोजी सकाळ सत्रात भारतीय समुहगानाचे सादरीकरण रंगले देशभक्तीपर, प्रेरणादायी आणि संस्कृतीचा वारसा जपणाऱ्या गीतांनी वातावरणात चैतन्य निर्माण केले. यात एकूण १८ सघांनी सतरंगी रंगो जैसा मेरा देश, येळकोट येळकोट जय मल्हार, ए मेरे वतन के लोगो, भारत माँ की इस धरती, खुशहाल हो अपना वतन, सरफरोशी की तमन्ना, उदे ग आई उदे, अंबाबाई तुला वंदन, भारत हमारा सबसे ज्यादा, इस धरती से प्यार सिखाया, या गीतांचे समुहगान सादर केले.
रंगमंच क्र. २ मधील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात पाश्चिमात्य गायनात विद्यार्थ्यांनी पॉप संगीतावर आधारीत सुरेल प्रस्तुती सादर करत जागतिक संगिताची झलक दाखविली. यात एकूण १३ सघांनी सहभाग नोंदविला. पाश्चिमात्य वाद्यसंगीतात विद्यार्थी कलावंतांनी कीबोर्ड, गिटार, ड्रमच्या माध्यमातून सुरांचा ताल धरला. यात एकूण १३ सघांनी सहभाग नोंदविला.
रंगमंच क्रमांक ३ मधील भगवान बिरसा मुंडा सभागृहात एकांकिका सादरीकरणाचे विशेष आकर्षण ठरले विद्यार्थ्यांनी सामाजिक, कौटुंबिक, भावनिक, शेती वाटणे विधवा विषयावर आधारीत पुनर्वसन, पाटी, वयाच गणित, वो दोनो, ॲडमिशन, बरड यासह इतर एकांकिका सादर करून उपस्थितांच्या मनावर ठसा उमटविला. प्रभावी अभिनय, संवादफेक, प्रकाश योजना, नेपथ्य आणि उत्कृष्ट दिग्दर्शनाच्या माध्यमातून एकांकिकेचे सादरीकरण झाले. सादर झालेल्या काही एकांकिकांनी सभागृहात भावनिकतेची लहर उमटविली. काही एकांकीकांनी काही खळखळून हसवत उपस्थित लोटपोट झाले. यात एकूण १० सघांनी सहभाग नोंदविला.
रंगमंच क्रमांक ४ मधील क्रांतीवीर खाज्या नाईक सभागृहात झालेल्या वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांनी विविध सामाजिक, शैक्षणिक, परंपरा, सांस्कृतिक, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय, ग्रामीण विकास आदि विषयांवर विद्यार्थ्यांनी आपली प्रभावीपणे मते मांडली. ओघवती वक्तृत्व शैली, विषयांची परीपक्कवता विद्यार्थ्यांमध्ये दिसून आली. यात एकूण २३ सघांनी सहभाग नोंदविला. त्यानंतर प्रश्नमंजूषा स्पर्धेत सामान्य ज्ञान, ज्ञान विज्ञान, संस्कृती आदि विषयांवर विचारलेल्या प्रश्नांवर विद्यार्थ्यांनी सहजपणे उत्तरे दिलीत.
रंगमंच क्रमांक ५ मधील बाल हुतात्मा शिरीष कुमार सभागृहात झालेल्या मातीकला, कोलाज आणि रांगोळी या स्पर्धांनी लक्ष वेधून घेतले. मातीकलेतून विद्यार्थ्यांनी निसर्ग, ग्रामीण जीवन आणि परंपरेचे दर्शन घडविले. यात एकूण २० सघांनी सहभाग नोंदविला. कोलाजमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्जनशील कल्पनाशक्तीचे अप्रतिम नमूने दिसून आले. यात एकूण २० सघांनी सहभाग नोंदविला. तर रांगोळी स्पर्धेत सप्तरंगांची उधळण आणि कलाकुसर पाहून रांगोळ्यांनी अक्षरशा मोहिनी घातली. यात एकूण २० सघांनी सहभाग नोंदविला.
शुक्रवार दि. ७ नोव्हेंबर रोजी होणारे कार्यक्रम : रंगमंच क्र. १ – राष्ट्रकवी बंकीमचंद्र चटोपाध्याय रंगमंच (दीक्षांत सभागृह) मध्ये पाश्चिमात्य समुहगान -सकाळी ९ ते दु. २ वाजेपर्यंत व भारतीय सुगमसंगीत – दु. ३ ते रात्री ९ वाजेपर्यंत, रंगमंच क्रमांक २ – स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह (सिनेट सभागृह) मध्ये नाट्यसंगीत स. ९ ते दु.२ वाजेपर्यंत व भारतीय शास्त्रीय वाद्यसंगीत (तालवाद्य) दु. ३ ते रात्री ९ वाजेपर्यंत, रंगमंच क्रमांक ३ – भगवान बिरसा मुंडा सभागृह (डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम विद्यार्थी भवन सभागृह) मध्ये एकांकिका स. ९ ते दु. ४ वाजेपर्यंत व मुकअभिनय सायं. ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत, रंगमंच क्रमांक ४ – क्रांतिवीर खाज्या नाईक सभागृह (पर्यावरणशास्त्र प्रशाळा सभागृह) मध्ये वादविवाद स्पर्धा स. ९.३० ते दु.३ वाजेपर्यंत, लघुचित्रपट सायं. ४ ते ९ वाजेपर्यंत, रंगमंच क्रमांक ५ – बाल हुतात्मा शिरीष कुमार सभागृह (जैवशास्त्र प्रशाळा सभागृह) मध्ये व्यंगचित्रे स. ९.३० ते दु.१२ वाजेपर्यंत, स्थळ छायाचित्रण दु. २ ते सायं. ४.३० वाजेपर्यंत, पोस्टर मेकींग सायं ५ ते सायं. ७.३० वाजेपर्यंत
यावेळी कुलगुरू प्रा.व्ही.एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे, व्य.प. सदस्य राजेंद्र नन्नवरे,नितीन झाल्टे, प्रा. सुरेखा पालवे, प्रा. शिवाजी पाटील, प्राचार्य महेंद्रसिंग रघुवंशी, डॉ. पवित्रा पाटील, अधिष्ठाता प्रा. अनिल डोंगरे, प्राचार्य जगदीश पाटील, अधिसभा सदस्य नितीन ठाकूर, नेहा जोशी, स्वप्नाली महाजन, डॉ. संदीप नेरकर, डॉ. ऋषीकेश चित्तम, वैशाली वराडे इ. अधिकार मंडळाचे सदस्य यांनी विविध रंगमंचाला भेट देवून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला.









