धरणगाव शहरातील घटना ; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
धरणगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील सत्यनारायण चौक परिसरात मंगळवार, दि. ४ नोव्हेंबर रोजी रात्री सुमारास ११ वाजता भूषण सुरेश भागवत या तरुणावर तिघांनी चाकूने सपासप वार करत गंभीर जखमी केल्याची घटना घडली असून, या हल्ल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भूषण सुरेश भागवत (वय ३४, रा. सत्यनारायण चौक, धरणगाव) हे चिंचोली येथील आरबीएल बँकेत नोकरी करतात. तसेच प्रवासी वाहतूक आणि दुचाकी दुरुस्तीचेही काम ते करतात. त्यांच्या घरासमोर दुरुस्तीसाठी आलेल्या काही दुचाकी उभ्या असतात. काही दिवसांपूर्वी त्यांच्या गल्लीत राहणारे साई अतुल कासार, तुषार ऊर्फ मुन्ना परेश नेरपगार व खत्री गल्लीतील क्रिश महेश राठोड यांनी या दुचाक्यांमधील पेट्रोल चोरी केल्याचा प्रकार उघड झाल्याने भूषण यांनी त्यांना दम दिला होता.
याच रागातून मंगळवारी रात्री साई कासार, तुषार नेरपगार व क्रिश राठोड हे मद्यधुंद अवस्थेत सत्यनारायण चौकात आले. तेव्हा भूषण भागवत हे त्यांच्या मित्र अमोल भगवान श्रीमावळे यांच्यासोबत उभे होते. जुन्या वादावरून पुन्हा वाद निर्माण झाला आणि साई कासारने भूषण यांना कानशिलात लगावून चाकूने त्यांच्या खांद्याजवळ वार केला. रक्तस्रावाने भूषण जमिनीवर कोसळले असताना मुन्ना नेरपगार व क्रिश राठोड यांनीही त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
भूषण यांचा मित्र अमोल श्रीमावळे व स्थानिक युवकांनी तत्काळ धाव घेऊन जखमी भूषण यांची सुटका केली आणि त्यांना प्रथम धरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्यांना अधिक उपचारासाठी जळगाव जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.
घटनेनंतर तिघेही आरोपी घरी परत येऊन भूषण यांच्या कुटुंबीयांनाही जीवे मारण्याची धमक्या देऊन गेल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी भूषण भागवत यांच्या फिर्यादीवरून साई कासार, तुषार ऊर्फ मुन्ना नेरपगार आणि क्रिश राठोड या तिघांविरुद्ध धरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .









