पाचोरा येथे भाजपा परिवर्तन मेळाव्यात वक्तव्य; विकासाच्या राजकारणावर भर, जातीपातीपासून दूर राहण्याचे आवाहन
पाचोरा (प्रतिनिधी) : भडगाव-पाचोरा विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचा भव्य परिवर्तन मेळावा बुधवार, दि. ५ नोव्हेंबर रोजी सारोळा रोडवरील समर्थ लॉन्स येथे उत्साहात पार पडला. या मेळाव्याला कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिता वाघ होत्या. यावेळी आमदार मंगेश चव्हाण, भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, माजी आमदार दिलीप वाघ, वैशाली सूर्यवंशी, अमोल शिंदे, प्रताप पाटील, मधुकर काटे, डी.एम. पाटील, सुभाष पाटील, सुचिता वाघ, संजय वाघ आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

या प्रसंगी उपस्थित कार्यकर्त्यांना उद्देशून आमदार मंगेश चव्हाण म्हणाले की, “आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपा उमेदवारांना विजयी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकदिलाने प्रयत्न करावेत. भडगाव-पाचोरा मतदारसंघात भाजपा संघटन नेहमीच मजबूत राहिले आहे. पंचायत समितीपासून जिल्हा परिषदपर्यंत भाजपा प्रतिनिधींनी यापूर्वी सत्ता मिळवली आहे.”
आपल्या भाषणादरम्यान आमदार चव्हाण यांनी आमदार किशोर पाटील यांच्या वक्तव्यावर टीका करताना म्हटले की, “एकीकडे ते विकासकामांना निधी मिळत नसल्याचे सांगतात, परंतु अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईसाठी जिरायती पंचनामे लावले गेले, याकडे त्यांचे दुर्लक्ष झाले. त्यामुळे शेतकऱ्यांचे ३० ते ३५ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.”
यावेळी त्यांनी ठाम शब्दांत आव्हान दिले की, “आ. किशोर पाटील यांनी चाळीसगाव नगरपालिकेत फक्त एक नगरसेवक निवडून आणावा, मी स्वतः त्यांचा सत्कार करीन.”
पुढे बोलताना त्यांनी म्हटले की, “माझ्या मतदारसंघात मी जाती-पातीच्या पलीकडे जाऊन विकासाचे राजकारण केले आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका या जातीय समीकरणावर नव्हे, तर विकासाच्या मुद्यावर लढवल्या जातील.”
मेळाव्याला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला असून, भाषणांदरम्यान घोषणाबाजी आणि टाळ्यांच्या गजरात परिसर दुमदुमून गेला. भारतीय जनता पक्षाच्या ताकदीचे हे मेळाव्याने पुन्हा एकदा दर्शन घडवले.









