२२ हजार ८८० रुपयांचा सुगंधित पान मसाला व तंबाखू जप्त; एकास अटक
पाचोरा ( प्रतिनिधी ) – पिपळगाव हरे गावातील रथ चौक परिसरात अवैधरीत्या सुगंधित पान मसाला आणि तंबाखू विक्री सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत २२ हजार ८८० रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला असून, या प्रकरणी जितेंद्र रामकृष्ण बडगुजर (रा. रथ चौक, पिपळगाव हरे) यास अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ३ नोव्हेंबर रोजी सहाय्यक पोलिस निरीक्षक कल्याणी वर्मा यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पोलिस उपनिरीक्षक प्रकाश, पोलीस हवालदार दीपक अहिरे, पोलीस कॉन्स्टेबल अमोल पाटील आणि मुकेश लोकरे यांची विशेष पथक तयार करून तत्काळ छापा टाकण्याचे आदेश दिले. त्यानुसार पथकाने पिपळगाव हरे येथे जाऊन रथ चौक भागात छापा मारला असता, आरोपी जितेंद्र बडगुजर हा आपल्या ताब्यात बेकायदेशीररीत्या गुटखा साठवून त्याची विक्री करत असल्याचे आढळले.
या कारवाईत पोलिसांनी एकूण २२,८८० रुपयांचा विमल पान मसाला आणि सुगंधित तंबाखू असा बंदी असलेला माल जप्त केला. तत्काळ अन्न सुरक्षा अधिकारी, जळगाव तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाशी संपर्क साधून त्यांच्या उपस्थितीत पंचनामा करून माल जप्त करण्यात आला.
या संदर्भात पिपळगाव हरे पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३०५/२०२५ नोंद करण्यात आला असून, आरोपीवर भा.दं.वि. कलम २७४, २७५, २३३, १२३ तसेच अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ चे कलम २६(२)(iv), २७(३)(d), २७(३)(e), ३०(२)(अ) व ५९(i) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रकाश पाटील हे मा. सपोनी कल्याणी वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.









