चाळीसगाव शहरात घडली घटना
चाळीसगाव प्रतिनिधी – सेवानिवृत्त बैंक कर्मचाऱ्याला पोलिस असल्याची बतावणी करून दोन भामट्यांनी सुमारे ७५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना गुरुवारी सकाळी करगाव रोडवर घडली. चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जयसिंग धनसिंग चव्हाण (६२, आदर्शनगर, चाळीसगाव) हे २९ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास दुचाकीवरून भाजीपाला घेऊन घरी जात असताना, अमर प्लाझा बिल्डिंगजवळ आलेल्या दोघांनी त्यांना अडवले. आम्ही पोलीस आहोत, शहरात लुटमार सुरू आहे, सोने घालू नका, ५ हजार दंड आहे, असे सांगून त्यांनी चव्हाण यांच्या अंगावरील सोन्याची चेन आणि अंगठी तपासाच्या नावाखाली घेतली. त्यांनी दागिने कागदात गुंडाळल्याचा बहाणा करून चव्हाण यांच्या हाती तो कागद दिला व पसार झाले. कागद उघडून पाहिल्यावर त्यात दगड आढळून आले. चाळीसगाव शहर पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









