मुक्ताईनगर तालुक्यात तीन वर्षांपूर्वी घडली होती घटना
भुसावळ प्रतिनिधी मुक्ताईनगर तालुक्यात धाबे पिंप्री शिवारात एका विहिरीमध्ये, लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असलेल्या महिलेला लोटून देत तिचा खून करणाऱ्या प्रियकराला भुसावळ सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा आणि ५ हजार रुपये दंड सुनावला आहे. या निकालामध्ये १७ साक्षीदारांची साक्ष महत्त्वाची ठरली.
गुलाम इद्रिस गुलाम हुसेन (वय ४५, रा. बऱ्हाणपूर) असे शिक्षा झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्या घरी पत्नी, मुले असा परिवार आहे. २०२० पासून तो एका महिलेसह लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. दरम्यान, दि. २७ मार्च २०२२ रोजी गुलाम इद्रिस हा महिलेला घेऊन सैलानी बाबाच्या दर्ग्याला गेला होता. तेथून परतल्यावर मुक्ताईनगर तालुक्यातील धाबे पिंप्री शिवारात पोहेकर नामक व्यक्तीच्या शेतात थांबले होते. त्यांची दुचाकी व दोघांना शेजारील शेतात राहणाऱ्या साक्षीदाराने पाहिले होते.
शेतात, महिलेने पुन्हा एकदा गुलाम इद्रिस यांच्याकडे लग्न करावे यासाठी तगादा लावला. मात्र नेहमीप्रमाणे इद्रीसने तिची मागणी धुडकावली. दोघांमध्ये वाद झाल्याने इद्रीसने तिला विहिरीत ढकलून देत खून केला.(केसीएन)ती दोराच्या साहाय्याने वर येऊ नये म्हणून त्याने इलेक्ट्रिक पंपाच्या मोटारीचे दोर व वायर विळ्याने कापून टाकले होते. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला २८ मार्च रोजी महिलेच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला होता. त्यानुसार पोलिसांनी तपास करून गुलाम इद्रिस याला ताब्यात घेऊन अटक केली होती.
हा खटला भुसावळ येथील न्या. एस. बी. हेडाऊ यांच्या न्यायालयात चालला. खटल्यात एकूण १७ साक्षीदार तपासण्यात आले. यात डॉ. अंजली पाटील, अधिकारी प्रदीप शेवाळे, पीएसआय राहुल बोरकर, सिमकार्ड कंपन्यांचे तांत्रिक विश्लेषण करणारे अधिकारी यांचा समावेश आहे. यात मुक्ताईनगर येथे वैद्यकीय अधिकारी असणाऱ्या डॉ. अंजली पाटील आता अमेरिकेत आहेत.(केसीएन)तरीही, न्यायालयाने व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे अमेरिका व भारतीय वेळेचा समन्वय साधून त्यांची महत्वाची साक्ष नोंदविली, हे या खटल्यात विशेष आहे. सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील मोहन देशपांडे यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून पोलीस शिपाई कांतीलाल कोळी, ज्ञानेश्वर चौधरी यांनी सहकार्य केले.









