जळगावातील शिवराम नगर येथे ९ तोळे सोने चोरीस गेल्याची प्राथमिक माहिती, पोलिसांचा तपास सुरू
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील शिवराम नगरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विधान परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आ. एकनाथराव खडसे यांच्या बंगल्यावर रात्री चोरट्यांनी चोरी केली असून सुमारे ९ तोळे सोने चोरीस गेल्याची प्राथमिक माहिती कार्यकर्त्यांकडून प्राप्त झाली आहे. याबाबत जिल्हा पोलीस दल तपास करीत असून माजी मंत्र्याच्या घरी चोरी झाल्याने घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

माजी मंत्री तथा विधान परिषदेतील आ. एकनाथराव खडसे यांचे जळगाव शहरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ शिवराम नगर येथे अनेक वर्षांपासून घर आहे. या घरामध्ये आ. खडसे हे नेहमी ये-जा करीत असतात सध्या दिवाळीनिमित्त आमदार खडसे हे त्यांच्या मूळ गावी कोथळी येथे होते. दरम्यान मंगळवारी दि. २८ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता घराची राखण करणारा कर्मचारी चेतन हा जेव्हा आला, तेव्हा त्याला गेटचे कुलूप तुटलेले दिसले. त्यांनी लगेच आ. खडसे आणि कार्यकर्ते अशोक लाडवंजारी यांना कळवले. अशोक लाडवंजारी यांनी येऊन घराची तपासणी केली असता घरातून ८ ते ९ तोळे सोने व ३५ हजार रोख रक्कम चोरीस गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली.

यानंतर रामानंदनगर पोलीस स्टेशन तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांना माहिती कळवण्यात आली. पोलीस दल घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी तपासणीला सुरुवात केली. या ठिकाणी श्वान पथक, ठसे तज्ज्ञ यांनी पाहणी केली. श्वानाने घरापासून आचार्य विद्यालयापर्यंत मार्ग दाखवला. मात्र तो तेथेच घुटमळ्ल्याचे दिसून आले. दरम्यान या घटनेमुळे आता जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था शिल्लक आहे की नाही अशी प्रतिक्रिया कार्यकर्ते अशोक लाडवंजारी आणि सुनील माळी यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
आ. खडसे यांच्या ४ अंगठ्या आणि त्यांच्या घरातील कर्मचारी गोपाल सरोदे यांचे ६ ते ७ तोळ्याचे सोने असे चोरीला गेल्याची प्राथमिक माहिती कार्यकर्त्यांनी दिली. राजकीय व्यक्तींच्या घरी चोरी झाल्यामुळे सामान्य जनतेचे काय असा प्रश्न आता विचारला जात आहे. रामानंद नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुन्हेगारी वाढत असल्याचे आता दिसून येत आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, एलसीबीची निरीक्षक राहुल गायकवाड यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी परिसराची पाहणी करून सीसीटीव्ही फुटेज मिळते काय याबाबत तपासणी केली. फॉरेन्सिक पथकाला बोलवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.









