पारोळा येथील घटना
पारोळा ( प्रतिनिधी ) – येथील एका ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाला मागील खटला मागे घेण्याच्या कारणावरून पिस्तुलाचा धाक दाखवून खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पारोळा येथील माधवराव पाटील (स्वामीनारायण नगर, पारोळा) व राहुल अनिल चौधरी, महेश कैलास चौधरी (दोन्ही रा. पारोळा) यांच्यात दि. १८ रोजी वाद झाला होता. याबाबत माधवराव पाटील यांनी पारोळा पोलिसात तक्रार दिली होती. या कारणावरून माधवराव पाटील हे दि. २० रोजी सकाळी ९ वाजता आपल्या ट्रान्सपोर्टच्या कार्यालयात बसले असताना राहुल व महेश यांनी कार्यालयात अनधिकृत प्रवेश केला.
पोलिस स्टेशनमधील तक्रार मागे घे, नाहीतर तुला जीवे ठार मारू, अशी धमकी दिली व पिस्तुलाचा धाक दाखवत ५० हजार रुपयाची खंडणी मागितली. याबाबत दाखल झालेल्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध दि. २५ रोजी पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा अधिक तपास पारोळा पोलिस करत आहेत.









