जळगाव शहरातील कांचन नगर भागात घटना
जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील कांचन नगर भागात दिवाळीच्या शुभेच्छा देण्यावरून झालेल्या वादातून एका तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची गंभीर घटना मंगळवारी २१ ऑक्टोबर रोजी रात्री ११.३० वाजता घडली. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्या डोक्याला दुखापत झाली आहे. या प्रकरणी गुरूवारी २३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता शनिपेठ पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनोज देविदास चौधरी (वय २७, व्यवसाय चालक, रा. चौगुले प्लॉट, जळगाव) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. मनोज चौधरी हा तरूण मंगळवार २९ ऑक्टोबर रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास कांचन नगरमधील जुनी बालवाडीजवळ, गुरुकृपा टेन्ट हाऊस शेजारी सार्वजनिक ठिकाणी त्यांचे मित्र गोलू सोनवणे, विनोद गायकवाड, विजय शिंदे आणि राहुल शिंदे यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत होते. त्याच वेळी खुशाल सोनार याने मनोजला शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. या कारणावरून त्यांच्यात बाचाबाची झाली.
त्याच वेळी दुसरा संशयित आरोपी चेतन सोनार (रा. जुनी बालवाडी, कांचन नगर,) हा तेथे आला आणि त्याने मनोज चौधरी यांना पकडून ठेवले. चेतन सोनारने पकडून ठेवताच, आरोपी खुशाल सोनार याने आपल्या हातातील कोयत्याने मनोज चौधरी यांच्या डोक्यावर जोरदार वार करून त्यांना गंभीर दुखापत केली. दरम्यान मी तुला सोडणार नाही अशी धमकी देवून जीवठार मारण्याची धमकी दोघांनी दिली. याप्रकरणी अखेर गुरूवारी २३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता मनोज चौधरी याने दिलेल्या फिर्यादीवरून मारहाण करणोर चेतन सोनार आणि खुशाल सोनार (दोन्ही रा. कांचन नगर) यांच्या विरोधात शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना विनोद अहीरे करत आहेत.









