भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनची कामगिरी
भुसावळ ( प्रतिनिधी ) – शहरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने विनापरवाना गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या रेकॉर्डवरील दोन आरोपींना भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या पथकाने मोठ्या शिताफीने रंगोली हॉटेल जवळील त्रिमूर्ती प्रोव्हिजनजवळून अटक केली आहे. आरोपींकडून दोन गावठी पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे असा एकूण ६१,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जळगावचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या आदेशानुसार, पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी रेकॉर्डवरील आरोपींवर लक्ष ठेवण्याची मोहीम सुरू केली होती. बुधवार, २२ ऑक्टोबर रोजी नाईट राऊंड पेट्रोलींग करत असताना पो.हे.कॉ. विजय नेरकर आणि पो.कॉ. जावेद शहा यांना गोपनीय माहिती मिळाली. रेकॉर्डवरील आरोपी कुणाल नितीन ठाकूर (वय १९, रा. कस्तुरी नगर, भुसावळ) हा रंगोली हॉटेल जवळील त्रिमूर्ती प्रोव्हिजन समोर गावठी पिस्तूल आणि काडतूस घेऊन उभा असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच, पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या आदेशानुसार डी. बी. पथकाने तत्काळ छापा टाकला.
पोलिसांनी कुणाल ठाकूरला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याजवळ एक लोखंडी गावठी पिस्तूल मॅगझीनसह आणि दोन जिवंत राउंड मिळाले. त्याच्याविरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कुणाल ठाकूरकडे अधिक चौकशी केली असता, त्याने हे पिस्तूल उदय राजू उजळेकर (वय २४, रा. वरणगाव) याच्याकडून विकत घेतल्याचे सांगितले. पोलिसांनी उदय उजळेकरला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि वरणगाव येथे अजून एक गावठी पिस्तूल लपविल्याची माहिती दिली. पोलिसांनी त्याच्याकडून १५ हजार रुपये किमतीचे एक गावठी पिस्तूल आणि १,००० रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस जप्त केले.
या कारवाईत दोन्ही आरोपींकडून ५८ हजार रूपये किंमतीचे एकूण दोन गावठी पिस्तूल आणि ३ हजार रूपये किंमतीचे तीन जिवंत काडतुसे असा एकूण ६१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पो.हे.कॉ. विजय बळीराम नेरकर हे करत आहेत.









