अंधाराचा घेतला फायदा : अमळनेर तालुक्यात कुऱ्हेजवळ घटना
अमळनेर (प्रतिनिधी) : जामनेर तालुक्यातील पहुर व अमळनेर तालुक्यातून गुरे चोरणाऱ्या जळगावच्या संशयित आरोपीना अमळनेर येथे आणत असताना २ आरोपी बेडयांसह पोलिसांच्या वाहनातून उतरून फरार झाल्याची घटना दि. २२ रोजी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास कुऱ्हे अंडरपास बोगद्यात घडली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

तालुक्यातून लोणे आणि पिंपळे येथून ७ गुरे चोरी झाली होती. त्याचा शोध एलसीबीचे संदीप पाटील, प्रवीण मांडोळे, हरीलाल पाटील, राहुल कोळी करीत असताना त्यांना सीसीटीव्ही फुटेजमध्ये जवखेडे येथे दुचाकी (एमएच १९ बीबी ५१९८)ही गुरे चोरीमध्ये दिसून आली. (केसीएन)पोलिसांनी तांत्रिक माहितीवरून मालक शोधला असता अकील कादिर पिंजारी (रा. आझाद नगर, पिंप्राळा, जळगाव) असे समजले. पोलिसांनी त्यांना २२ रोजी दुपारी २ वाजता ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने त्याचे साथीदार शाकीर शाह अरमान शाह (वय ३०, रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव), अमजद शेख फकीर कुरेशी (वय ३५ रा. अशोक किराणा जवळ, मेहरूण), आफताब आलम शेख रहीम (रा. नशिराबाद, जळगाव), तौसिफ शेख नबी (रा. फातिमा नगर, जळगाव) यांची नावे सांगितली.
सर्वानी टोळीने अमळनेर तालुक्यात ७ आणि पहुर येथे ३ गुरे चोरी केल्याचे कबुल केले आणि चोरीत त्यांनी पिकअप वाहन क्रमांक (एमएच १९ सीव्ही ७१६९) वापरल्याचे सांगितले. पैकी ४ जणांना ताब्यात घेतले आणि तौसिफ शेख नबी हा घरी मिळून आला नाही. या संशयित आरोपीना स्पॉट व्हेरिफिकेशनसाठी दि. २२ रोजी रात्री शासकीय वाहनाने अमळनेर येथे आणत असताना त्यातील शाकीर शाह अरमान शाह व अमजद शेख फकीर कुरेशी याना बेड्या घालून मागच्या सीटवर बसवले होते. (केसीएन)अमळनेर जवळ कुऱ्हे रेल्वे अंडरपास बोगद्यात वाहन आल्यावर मागच्या सीट वरून दोघे जण उतरून पळून गेले. पोलिसांना कळताच त्यांनी आजूबाजूला शोध घेतला. मात्र आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पिकात लपून गेले. त्यामुळे ते मिळून आलेले नाही. तर उर्वरित ताब्यात असलेले दोघे आरोपीना पोलिसांनी अमळनेर पोलीस स्टेशनला जमा केले आहे. दोघा फरार आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २६२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर करीत आहेत.









