शिरीष चौधरींच्या पक्षप्रवेशानंतर शिवसेना-राष्ट्रवादीतील राजकारण तापले
नंदुरबार (प्रतिनिधी) :- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील राजकारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर आता तापले आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अमळनेरचे आमदार अनिल पाटील आणि नुकतेच शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेले माजी आ. शिरीष चौधरी यांच्यात सुंदोपसुंदी सुरु झाली आहे. पाटलांनी टीका करताच चौधरींनीही आता प्रत्युत्तर दिले आहे. आ. अनिल पाटील हे यंदा अपघाताने निवडून आले असून मंत्री पद न मिळाल्याच्या वैफल्यातूनच ते बेताल वक्तव्य करत असल्याची टिका माजी आमदार शिरीष चौधरी यांनी केली आहे.


माजी आ. शिरीष चौधरी यांनी नुकताच शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यांच्यावर, ‘शिरीष चौधरी यांच्या एकाही उमेदवाराला महायुतीत बरोबर घेणार नसून ते एमआयएम मध्ये गेले तरीही अमळनेर मध्ये फरक पडणार नसल्याची टिका अनिल पाटील यांनी केली होती. त्यालाच आता शिरीष चौधरींनी प्रतिउत्तर दिले. जळगाव जिल्ह्यातील आगामी अंमळनेर नगरपालिकेच्या निवडणूकीवरुन आता आजी -माजी आमदारांमध्ये चांगलेच वाकयुद्ध रंगले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अमळनेर नगरपालिकेत शिवसेना एकनाथ शिंदे गट स्वबळावर निवडणूक लढवणार असून आम्हालाच अनिल पाटील यांची गरज नसल्याचे शिरीष चौधरी यांनी अनिल म्हटले आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे दोन दिवसांपुर्वी झालेल्या राष्ट्रवादीच्या जिल्हा आढावा बैठकीला उपस्थित असलेल्या माजी मंत्री आमदार अनिल पाटील यांनी शिरीष चौधरी यांच्या शिवसेना प्रवेशावरुन त्यांना लक्ष केले होते. माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या एकाही उमेदवाराला आम्ही जवळ करणार नाही, असा इशारा आ. अनिल पाटील यांनी दिला होता. महायुती म्हणून आमची भाजप, ओरीजनल शिवसेना आणि राष्ट्रवादी असाच विचार होवू शकतो. शिरीष चौधरींबाबत जळगाव जिल्ह्यात आम्ही महायुती म्हणून विचारच करु शकत नाही. राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी कोणाचा तरी हात धरला पाहीजे, कोणाला तरी सोबत घेतल पाहीजे, अशा शोधात शिरीष चौधरी होते, असे आ. पाटील म्हणले होते. तर, आमदार अनिल पाटील एकही नगरसेवक निवडून आणू शकलेले नव्हते. त्यामुळे नगरपालिका निवडणूकांमध्ये त्यांची आम्हाला गरज नसून शिवसेनेची स्वबळाबर लढण्याची तयारी असल्याची भुमिका शिरीष चौधरी यांनी मांडली आहे. आम्ही एकनाथ शिंदे आणि गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला असून महायुती बाबत सर्व अधिकार त्यांना असल्याने आमदार अनिल पाटील यांना कोण विचारतं, अशी टिका देखील शिरीष चौधरी यांनी केली आहे.









