
जळगाव शहरातील निमखेडी रेल्वे पुलाजवळ घडली होती घटना
जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील निमखेडी शिवारात रेल्वे पुलाजवळ तसेच बांभोरीच्या दिशेने असणाऱ्या गिरणा नदीमध्ये शुक्रवार दि. ३ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास देवीमातेच्या मूर्तीचे विसर्जन करण्यास गेलेला तरुण वाहून गेल्याची धक्कादायक घटना उघड झाली होती. तरुणाचा मृतदेह मिळून आला नव्हता. अखेर गुरुवारी दि. २३ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता आढळून आला आहे. पाळधी दूरक्षेत्र पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे.
हेमेश संतोष पाटील (वय १८, रा.मयुरेश्वर कॉलनी, दादावाडी परिसर, जळगाव) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. आई आणि जुळ्या भावासह तो राहत होता. दरम्यान शुक्रवारी दि. ३ सप्टेंबर रोजी दुपारी साडेअकरा वाजता निमखेडी रेल्वे पुलाजवळ हेमेश मित्रांसोबत विसर्जन करण्यासाठी निघाला होता.(केसीएन) दुपारी १२ वाजता रेल्वे पुलाजवळ हेमेश पाटील याने देवी मातेच्या मूर्तीचे विसर्जन केले. त्यानंतर पाय घसरून तो नदीपात्रात वाहून गेला होता.
महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती.त्या ठिकाणी त्यांनी बचाव कार्य सुरू केले होते. मात्र तो मिळून आला नव्हता.(केसीएन)अखेर २० दिवसांनी दि. २३ रोजी पाळधीजवळ दोनगांव शिवारात गिरणा नदीकाठी तरुणाचा मृतदेह गुरे चारणाऱ्या व्यक्तींना आढळून आला. पाळधी पोलिसांना माहिती दिल्यावर त्यांनी मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविला. याठिकाणी रुग्णालयात कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. घटनेची पाळधी पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.









