भुसावळ तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील घटना
भुसावळ ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील कुऱ्हा पानाचे शिवाराजवळ एका क्रेन मोन्टेड ट्रकने भरधाव वेगात धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात तरुण जागीच ठार झाला. याप्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध भुसावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत तरुणाचे नाव राहुल राजाराम तंवर (वय २५, रा. महादेवमाळ, ता. भुसावळ) असे आहे. याबाबत त्याचे वडील राजाराम मयाराम तंवर (वय ५८, व्यवसाय – मजुरी) यांनी फिर्याद दिली आहे. हा अपघात दि. १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कुऱ्हा पानाचे गावाजवळील महाराष्ट्र ढाब्याच्या मागील रोडवर घडला. राहुल हा आपल्या हिरो स्प्लेंडर प्रो (एमएच १९ बीएन ३३८६) या काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरून जात असताना समोरून आलेल्या एका भरधाव ट्रकने त्याला जोरदार धडक दिली.
अपघातग्रस्त क्रेन मोन्टेड ट्रक (एमएच १९ बीएम ४३४३) हा नियामुद्दीन अन्सारी (वय ६८, रा. चिचाकी ब्लॉक सिरीया, ग्राम पिपराडीह, पोस्ट बंधखारो, गिरिडीह, झारखंड. सध्या मुक्काम चौधरी ऑटोमोबाईल, साकेगाव शिवार, ता. भुसावळ) यांच्या ताब्यात होता. फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, आरोपी चालक निष्काळजी, बेजबाबदारपणे व भरधाव वेगात वाहन चालवून राहुलच्या मृत्यूस कारणीभूत ठरला. या प्रकरणी भुसावळ पोलीस ठाण्यात अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास पीएसआय संजय कंखरे करीत आहेत.