शासनाकडून दुर्लक्ष झाल्याने काळी दिवाळी साजरी करण्याचा निर्धार
ठाणे (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेअंतर्गत येणाऱ्या प्रशिक्षणार्थींच्या रोजगाराबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बोलून आठवड्याभरात निर्णय घेतला जाईल असे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागील रविवारी प्रशिक्षणार्थींना दिले होते. परंतू,आठवडा उलटून गेला तरी सरकारकडून अद्याप कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्यामुळे आज, पुन्हा राज्यातील ३६ जिल्ह्यातील जवळपास दोन हजार प्रशिक्षणार्थी ठाणे शहरात दाखल झाले आहेत. हे सर्वजण कोर्टनाका परिसरात ठिय्या मांडून बसले आहे.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आम्हाला दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही म्हणून काळी दिवाळी साजरी करण्याचा निर्णय आम्ही घेतला असल्याचे आंदोलनकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे. ऐन दिवाळीच्या दिवसात हे सर्व प्रशिक्षणार्थी कोर्टनाका परिसरात जमल्यामुळे याठिकाणी मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. राज्यात पार पडलेल्या २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहिण योजनेपाठोपाठ युवावर्गासाठी कौशल्य विकास विभागांतर्गत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजना राबवली. तसेच, १० लाख युवांना शैक्षणिक पात्रतेनुसार प्रतीमाह ६ हजार आणि १० हजार मानधन देण्यासोबत त्याच आस्थापनेत कायम करणार असल्याचे आश्वासित केले होते.
त्यानुसार या योजनेत विविध सरकारी आस्थापनामध्ये काम केलेले तब्बल १ लाख ७५ हजार प्रक्षिणार्थी आजघडीला प्रशिक्षित बेरोजगार बनले आहेत. सरकारने त्यांना वाऱ्यावर सोडले असून लाडक्या बहिणीच्या भावाने अर्थात एकनाथ शिंदे यांनी एक प्रकारे आपल्या भाचा भाचींना फसवल्याचा आरोप मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष बालाजी पाटील चाकुरकर यांनी केला. त्यापार्श्वभूमीवर हजारो प्रशिक्षणार्थीनी मागील रविवारी एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात आले होते. परंतू, ८ दिवसात आश्वासन पूर्ण केले नाही तर, आमची दिवाळी काळी करणाऱ्या सरकारलाही दिवाळी साजरी करू देणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेने दिला होता. त्यानुसार, आठवडा उलटून गेला तरी आश्वासन पूर्ण केले नसल्यामुळे राज्यातील हजारोच्या संख्येने प्रशिक्षणार्थी आज, रविवारी सकाळपासून पुन्हा ठाणे कोर्टनाका परिसरात जमले असून त्यांच्याकडून जोरदार घोषणाबाजी सुरु आहे.
०००००००००००००००००