चोपडा तालुक्यात मामलदे रस्त्यावर घटना, रुग्णालयात प्रचंड आक्रोश
चोपडा (प्रतिनिधी) : शहरातील कामे आटोपून मामलदे येथे दुचाकीने जात असतांना समोरून भरधाव वेगात येणाऱ्या अज्ञात चारचाकी वाहनाने कट मारल्याने दुचाकी समोर धडकून झालेल्या गंभीर अपघातात अमोल ज्ञानेश्वर पाटील (वय २५) व पृथ्वीराज चंद्रकांत पाटील (वय २३) हे दोघे तरुण जागीच ठार झाल्याची घटना चोपडा-मामलदे फाटादरम्यान दि. १६ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली.
अपघाताच्या घटनेने मामलदे व परिसरात सर्वत्र शोककळा पसरली आहे. अपघाताची माहिती मिळताच मामलदे, चुंचाळे व चोपडा शहरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. शहर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून अपघातातील दोघा तरुणांना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले परंतु तपासणीअंती डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले. यावेळी शहरातील व मामलदे आदी गावातील शेकडो नागरिकांनी उपजिल्हा रुग्णालयात गर्दी केली. कुटुंबीयांनी व मित्रांनी आक्रोश केला होता.चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.