भुसावळ शहरातील घटना
भुसावळ (प्रतिनिधी) : दारू पाजण्यास नकार दिल्याचा राग मनात धरून शेख जाकीर या रिक्षाचालकावर त्याच्या मित्रानेच जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली. या प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, आरोपीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
शेख जाकीर हे दि. ११ रोजी सायंकाळी बारमध्ये बसले होते. त्यावेळी संशयित राहुल सुरवाडे तेथे आला व ‘तू मला आज दारू पाज’ अशी मागणी केली. मात्र, जाकीर यांनी स्पष्ट नकार दिला. नकारामुळे संतापलेल्या राहुलने जाकीर यांच्याशी वाद घालून शिवीगाळ केली आणि मारहाण केली. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे जाकीर जमिनीवर कोसळले. काही वेळाने राहुल पुन्हा तेथे पोहोचला. त्याने जाकीर यांना खाली पाडून लाथाबुक्क्यांनी आणि हातातील ‘फायटर’ने जबर मारहाण केली. त्यांना दुसऱ्या एका मित्राने ग्रामीण रुग्णालय, भुसावळ येथे दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना सरकारी रुग्णालय, जळगाव येथे हलवण्यात आले.