यावल तालुक्यातील फैजपूर येथील घटना
यावल (प्रतिनिधी) : पशुखाद्याच्या रकमेसह विविध प्रकारे चार जणांनी फसवणूक केल्याची घटना तालुक्यातील फैजपूर येथे घडली. विश्वासघात केल्यावरून चार जणांविरोधात फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येथील हरचंद नरसो वाघुळदे यांच्या वैभव पशुखाद्य या दुकानावरून पशुखाद्याचे ३० पोते विकत घेऊन या पशुखाद्याची रक्कम ७५ हजार रुपये फिर्यादी यांना न देता त्यांना त्या रकमेचा ऑक्सिस बँकेचा चेकवर खोटी सही करून चेक दिला. फिर्यादी यांनी आरोपी शेख आसिफ शेख शरीफ (रा. विवरा, ता. रावेर) यांच्याकडे वारंवार जाऊन त्याचे पशुखाद्याचे ७५ हजार रुपयांची मागणी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे देऊन फिर्यादी यांची फसवणूक केली आहे.
तसेच आरोपी आरिफ शेख शरीफ (रा.विवरा), वामन तायडे (रा. सिंगनूर, ता. रावेर) या दोघा संशयित आरोपींनी साक्षीदार संदीप पाटील यांच्याकडून इलेक्ट्रिक बाइक घेऊन त्यांचे ६० हजार रुपये तसेच हेमचंद्र ज्ञानदेव भारंबे यांच्याकडून ४९ हजार रुपये किमतीची गाय घेऊन, तर साक्षीदार दीपक सुधाकर धांडे यांच्याकडून ५० हजार रुपये किमतीचे सेंट्रींग प्लायवूड घेतले आहे. अशाप्रकारे फिर्यादी व साक्षीदार यांचे एकूण २ लाख ३४ हजार रुपयाचे साहित्य संशयित आरोपीतांनी संगनमत करून फिर्यादी व साक्षीदार यांचा विश्वास संपादन करून विश्वासघात करून फसवणूक केली आहे.
याबाबत फैजपूर स्टेशनला फिर्यादी हरचंद नरसो वाघुळदे यांनी फिर्याद दिल्यावर संशयित आरोपीविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली आहे. या आरोपींनी याव्यतिरिक्त फैजपूर शहरासह अन्य ठिकाणी अनेकांची फसवणूक केली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी या संशयित आरोर्षीवर कडक कारवाई होण्याची मागणी केली आहे. या गुन्ह्याचा तपास ए.पी.आय रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली पी. एस. आय मैनुद्दीन सय्यद करीत आहेत.