जळगाव शहरातील मोहाडी रोडवरील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : तरुणीला सोबत घेवून फिरणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण करीत त्याची दुचाकी पेटवून दिल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि. ११ ऑक्टोबर रोजी मोहाडी रोड परिसरात घडली.
शेख समीर शेख सलीम (वय २७, रा. शिवाजीनगर, जळगाव) याने फिर्याद दिली आहे. समीर हा त्याच्या मैत्रिणीसह दुचाकीवरून जात असताना मोहाडी रोडवर त्याला टोळक्याने थांबविले. या तरुणाला विनाकारण त्रास देऊन बेदम मारहाण केली. यानंतर त्याच्या दुचाकीला (एमएच १९ सीएल ४९६२) जाळून खाक केले. महापालिकेच्या अग्निशमन दलाचा बंब येईपर्यंत दुचाकी जळली होती. या प्रकरणी शेख समीर याने एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून मारहाण करणारे संशयित आरोपी किशोर रवींद्र जाधव (रा. समता नगर), भरत वासुदेव बेंडाळे (रा. नेहरू नगर), गणेश महादू गवळी (रा. मोहाडी) यांच्यासह इतर चार जणांविरुद्ध दंगा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक अशोक काळे करीत आहेत.