जळगाव शहरातील हतनूर कॉलनी येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील हतनूर कॉलनी परिसरात असलेल्या एका भांडी विक्रीच्या दुकानातून अज्ञात चोरट्यांनी तब्बल १ लाख ४९ हजार १५० रुपये किमतीची भांडी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही चोरी २८ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर या सुमारे महिनाभराच्या कालावधीत घडली असून, दुकान मालकाच्या तक्रारीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील रायसोनी नगरातील गौरी अपार्टमेंटमध्ये अविनाश बबन रंधे (वय ४५) हे वास्तव्यास आहेत. मायादेवी मंदिरासमोरील हतनूर कॉलनी परिसरात त्यांचे भांडी विक्रीचे दुकान आहे. अविनाश रंधे यांनी या दुकानात विविध प्रकारची भांडी विक्रीसाठी ठेवली होती. २८ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर २०२५ या सुमारे एक महिन्याच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या या बंद दुकानात प्रवेश केला. दुकानातून १ लाख ४९ हजार १५० रुपये किमतीची विविध भांडी लंपास केली. ही चोरीची घटना नुकतीच उघडकीस आल्यानंतर अविनाश रंधे यांना मोठा धक्का बसला. विक्रीसाठी ठेवलेला लाखो रुपयांचा माल चोरीला गेल्याचे लक्षात येताच त्यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधला. या चोरीमुळे व्यावसायिक अविनाश रंधे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यांनी तातडीने रामानंद नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे हे करीत आहेत.