जळगाव तालुक्यात ममुराबाद रोडवरील घटना
जळगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील ममुराबाद रोडवरील एका शेतातील विहिरीत सुमारे ४५ ते ५० वयाच्या अनोळखी इसमाचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना शनिवारी ११ ऑक्टोबर रोजी सकाळी उघडकीस आली.
वीरेन खडके यांच्या शेतातील विहिरीमध्ये हा मृतदेह आढळला. विहिरीत मृतदेह तरंगत असल्याची माहिती मिळताच जळगाव तालुका पोलिस ठाण्याचे कर्मचारी प्रकाश चिंचोरे, प्रदीप राजपूत, सोपान पाटील आणि देवेंद्र पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मृतदेह बाहेर काढून पुढील तपासासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवला. मृत इसमाची ओळख अद्याप पटलेली नसून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. दरम्यान, रविवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास पोलिसांनी स्मशानभूमीत विधिवत अंत्यविधी केला.