जळगाव शहरातील मेहरूण परिसरातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : घरात चुलत बहीण घराच्या छतावर गोधडी सुकवायला टाकत असताना तिचा विजेच्या तारांवर स्पर्श होणार होता; पण जिवाची पर्वा न करता, भाऊ अजय सोनवणे याने तिला दूर लोटत तिचा जीव वाचविला. मात्र, त्याच लोखंडी रॉडला त्यांचे दोन्ही हात लागल्याने तो गंभीर जखमी झाला. उपचारांती त्याचे दोन्ही हात कापावे लागले आहे. दि.२१ सप्टेंबर रोजी जळगाव शहरातील मेहरूण परिसरात ही हृदयद्रावक घटना घडली. दि. ६ ऑक्टोबर रोजी अजय सोनवणे याचे दोन्ही हात कापण्यात आले. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे.
घराच्या छतावर ७ वर्षांची चुलत बहीण गोधडी टाकत असताना ती चुकून उच्चदाबाच्या विजेच्या तारांवर पडली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून भाऊ अजयने क्षणाचाही विलंब न करता तिला धोक्यापासून वाचवण्यासाठी हातात लोखंडी रॉड पकडली आणि बहिणीला बाजूला ढकलले. यामुळे त्याला विजेचा जबरदस्त धक्का बसला, ज्यामुळे दोन्ही हात भाजल्यामुळे गंभीर जखमा झाल्या. त्याला प्रथम शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले गेले. परंतु हात भाजले गेल्याने पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे नेण्यात आले. खासगी रुग्णालयाचा खर्च न परवडल्यामुळे अखेर दि. १ ऑक्टोबर रोजी जळगाव जीएमसीमध्ये पुढील उपचारासाठी आणले. उपचारादरम्यान त्याचे दोन्ही हात कापावे लागले आहे.