महाराष्ट्राला पराभवाचा धक्का, विजेतपदासाठी पश्चिम बंगाल अन् केरळमध्ये लढत
जळगाव (प्रतिनिधी): अनुभूती निवासी स्कूलच्या पटांगणावर सुरु असलेल्या सीआयएससीई-१७ वर्षांखालील क्रिकेट राष्ट्रीय अजिंक्यपद-२०२५ स्पर्धेत बुधवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात केरळ आणि पश्चिम बंगालने विजय मिळवून अंतिम फेरी गाठली. केरळने महाराष्ट्राचा तर पश्चिम बंगालने तामिळनाडूच्या संघाचा पराभव केला. आता दोन्ही संघात विजेतेपदासाठी गुरुवारी लढत होणार आहे.
उपात्यंफेरीच्या पहिला सामना पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या दोन्ही संघात झाला. या सामन्यात पश्चिम बंगालने प्रथम फलंदाजी करत १९.४ षटकांत ९ गडी गमावून १११ धावा केल्या. परंतु तामिळनाडूचा संघ २० षटकांत सात गडी गमावून १०८ धावाच करु शकला. यामुळे पश्चिम बंगालने १ विकेटने विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. उद्या सकाळी ८.०० वाजता स्पर्धेतील तिसऱ्या क्रमांकसाठीचा सामना तामिळनाडू विरुद्ध महाराष्ट्र यांच्या दरम्यान खेळविण्यात येईल.
महाराष्ट्राच्या सलामीवीरांची शतकी भागेदारी
दुसरा उपांत्यफेरीचा सामना महाराष्ट्र आणि केरळ संघात झाला. यावेळी जैन फार्म फ्रेश फूडस् लि. चे संचालक अथांग जैन यांच्या उपस्थितीत नाणेफेक झाली. सामन्यात महाराष्ट्राने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवर शारव शहा आणि आदर्श गव्हाणे यांनी हा निर्णय योग्य ठरवत जोरदार फटकेबाजी केली. दोघांनी पहिल्या गडीसाठी शतकी भागेदारी केली. शारव शहा हा ४६ धावांवर बाद झाला तेव्हा संघाची धावसंख्या १०७ झाली होती. त्यानंतर आदर्शचेही अर्धशतक होऊ शकले नाही. त्याने तीन चौकर आणि एका षटकारच्या साह्याने ४८ धावा केल्या. महाराष्ट्राच्या संघाने २० षटकांत १६५ धावा केल्या. महाराष्ट्राने दिलेले १६६ धावांचे आव्हान स्वीकारत केरळचा संघ मैदानात उतरला. या संघाने जोरदार फलंदाजी केली. त्यांच्या सलामी जोडीने विजयाचा पाया रचला. त्यानंतर इतर खेळाडूंनी साथ देत १९.३ षटकांत १६९ धावा करत विजय मिळवला. त्यानंतर अभंग जैन यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅच पुरस्कार आदी लोंगणी देण्यात आला.
बुधवारी साखळी फेरीचे दोन सामने झाले. त्यात पहिला सामना उत्तराखंडने दहा गडी राखत युएई या संघावर विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत युएई या संघाने १४.५ षटकांत केवळ ५४ धावा केल्या. उत्तराखंडने हे आव्हान ४.५ षटकात एकही गडी न गमावता पूर्ण केले. दुसरा साखळी सामना महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश यांच्यात झाला. या सामन्यात महाराष्ट्राने प्रथम फलंदाजी करत तीन गडी गमावून १३४ धावांचा डोंगर रचला. त्यात सलामीवर शारव शहा याने ३० धावा केल्या. विश्वजित जगतापने १८ तर आदर्श गव्हाणे याने नाबाद २२ धावांची खेळी केली. आदी लोंगनी याने केवळ १८ चेंडूत ३८ धावांची धुवांधार खेळी केली. महाराष्ट्राने विजयासाठी दिलेले १३५ धावांचे आव्हान आंध्र प्रदेशचा संघ पेलू शकला नाही. त्यांचे खेळाडू निर्धारित १५ षटकांत केवळ ४ गडी गमावून ९८ धावाच करु शकले.
स्पर्धेसाठी जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रमुख अरविंद देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षक तन्वीर अहमद आणि क्रीडा समन्वयक रवींद्र धर्माधिकारी, सुयश बुरकूल, अजित घारगे, योगेश ढोगंळे, मुस्ताक अली, उदय सोनवणे, धनश्याम चौधरी, तन्वीर अहमद, राहुल निंभोरे, शशांक अत्तरदे, समीर शेख, जयेश बाविस्कर, किशोरसिंग शिसोदिया, प्रविण ठाकरे, मोहम्मद फजल, नचिकेत ठाकूर यांनी परिश्रम घेतले.
फोटो ओळ
(DSC07478)- अनुभूती क्रीडांगणावर सुरू असलेल्या सामन्यांचे नाणे फेक करताना जैन फार्म फ्रेश फूडस् लि. चे संचालक अथांग जैन व महाराष्ट्र तसेच केरळ संघाचे खेळाडू…
फोटो ओळ (DSC07544)- अनुभूती क्रीडांगणावर सुरू असलेल्या सामन्यांमध्ये ‘मॅन ऑफ दी मॅच पुरस्कार आदी लोंगणी याला प्रदान करताना जैन इरिगेशनचे अभंग जैन