यावल तालुक्यातील मोर नदीच्या पुलावर घडली घटना
यावल ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील अंजाळे गावाजवळील मोर नदीच्या पुलावर शनिवारी एक दुर्दैवी घटना घडली. ट्रक आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात टाकरखेडा येथील ५५ वर्षीय दुचाकीस्वार संतोष धनगर यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका जबरदस्त होता की, दुचाकी पूर्णतः चिरडली गेली. यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संतोष उखर्डू धनगर (वय ५५, रा. टाकरखेडा, ता. यावल) हे भुसावळकडून यावलच्या दिशेने दुचाकी (क्र. एम. एच. १९ डी.क्यु.७३६९) वरून जात असताना मोर नदीच्या पुलावर समोरून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने (क्र. एम. एच. ३४ बी.जी. ५०१५) त्यांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी तीव्र होती की, पुलाच्या वळणावरच संतोष धनगर यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच अंजाळे ग्रामपंचायतचे सदस्य आनंद सपकाळे आणि गावातील काही नागरिक तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. यावल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी यावल ग्रामीण रुग्णालयात हलविला. या प्रकरणी संतोष धनगर यांचे नातेवाईक दीपक धनगर यांच्या तक्रारीवरून ट्रकचालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.