जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील घटना
जळगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील कुसुंबा येथील गणपती नगरात एका घरावर शनिवारी ४ ऑक्टोबर रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास ८ ते १० अज्ञात हल्लेखोरांनी दुचाकीवरून येत ३ वेळा गोळीबार करून आणि दगडफेक केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात पाटील यांच्या घराचे आणि दुचाकीचे मोठे नुकसान झाले असून, परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. हल्ल्यामागील कारण अद्याप अस्पष्ट असून, एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
चंद्रशेखर पाटील हे पत्नीसोबत घरात जेवण करत असताना हा हल्ला झाला. त्यांचा एक मुलगा कामावर, तर दुसरा बाहेरगावी गेला होता. रात्री साडेदहाच्या सुमारास अचानक काही दुचाकी त्यांच्या घरासमोर थांबल्या. त्यावरून उतरलेल्या ८ ते १० हल्लेखोरांनी प्रथम शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. काही कळायच्या आतच त्यांनी घराच्या दिशेने जोरदार दगडफेक सुरू केली, ज्यामुळे खिडक्यांच्या काचा फुटल्या. त्यानंतर, घराबाहेर लावलेली पाटील यांची दुचाकीही फोडली.
यावरच न थांबता, हल्लेखोरांपैकी काहींनी आपल्याजवळील अग्नीशस्त्राने घराच्या दिशेने ३ राउंड फायर केले. अचानक झालेल्या गोळीबाराच्या आवाजाने पाटील कुटुंब आणि शेजारी प्रचंड घाबरले. घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी घटनास्थळावरून गोळीबाराच्या दोन रिकाम्या पुंगळ्या घराबाहेरून आणि एक घरातून जप्त केली आहे. फॉरेन्सिक पथकानेही पुरावे गोळा केले असून, हल्लेखोरांच्या शोधासाठी विविध पथके रवाना करण्यात आली आहेत.









