मुक्ताईनगर तालुक्यातील पिंप्राळा गावाजवळची घटना
मुक्ताईनगर (प्रतिनिधी): तीन दिवसांपूर्वी हरविलेल्या तालुक्यातील पिंप्राळा येथील तरुणाचा मृतदेह शेतातील विहिरीत आला. हातपाय ताराने बांधलेल्या अवस्थेत सापडल्याने ही आत्महत्या आहे, की घातपात याबाबत शंका व्यक्त होत आहे. मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली असून पोलीस तपास करीत आहेत.
कु-हा गावापासून जवळच असलेल्या पिंप्राळा येथील भागवत पुरुषोत्तम पडोळकर (वय २७) हे बुधवारी दिनांक १ रोजी सायंकाळपासून बेपत्ता झाले. नातेवाइकांनी शोध घेतला असता, तो आढळून आला नाही. शुक्रवारी सकाळी आठ ते साडेआठच्या सुमारास त्याच्या वडिलांनी गावाशेजारील विहिरीत डोकावून बघितले असता, भागवत याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. याबाबत माहिती मिळताच हवालदार अशोक जाधव, पोलिस नाईक प्रदीप इंगळे, कर्मचारी सागर सावे, प्रवीण जाधव, अनिल देवरे, श्रावण भिल्ल आदींनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिस उपअधीक्षक सुभाष ढवळे, निरीक्षक आशिष अडसूळ यांनीही घटनास्थळ गाठले. पोलिस पाटील महादेव झाल्टे आणि ग्रामस्थ यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आला. दरम्यान घटने प्रकरणी पोलीस तपास करीत असून गावामध्ये शोककळा पसरली आहे.