जामनेर तालुक्यात सोयगाव ते शेंदुर्णीदरम्यान घडली घटना
जळगाव ( प्रतिनिधी ) – सोयगाव येथून शेंदुर्णी येथे घरी जात असताना २ दुचाकींच्या झालेल्या भीषण अपघातात २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून इतर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेप्रकरणी पोलीस स्टेशनला नोंद करण्याचे काम सुरू होते.
विशाल अशोक गुजर (वय २७, रा. शेंदुर्णी ता. जामनेर) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो आईसह शेंदुर्णी गावात राहत होता. खाजगी वाहनांवर चालक म्हणून तो काम करीत परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता.(केसीएन)दरम्यान, मित्रांसोबत तो शुक्रवारी सोयगावकडे गेला होता. रात्री घरी शेंदुर्णीकडे परतत असताना शनिवारी दि. ४ ऑक्टोबर रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास समोरून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीने जबर धडक दिली.
या धडकेत विशाल गुजर यांच्या सोबत असणारे दोघे मित्र गंभीर जखमी झाले. तर विशाल याला डोक्याला इजा बसल्याने त्याचा मृत्यू झाला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे त्याला दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मयत घोषित केले. रुग्णालयात कुटुंबीय व मित्र परिवाराने आक्रोश केला. घटनेप्रकरणी शेंदुर्णी गावात शोककळा पसरली असून शनिपेठ पोलीस स्टेशनला प्राथमिक अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.