जळगाव शहरातील खोटे नगर परिसरातील घटना
जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील खोटे नगर परिसरात रावण दहन पाहण्यासाठी गेलेले सुरेश भागवत जगताप (वय ५१, रा. सत्यम पार्क) यांच्या घरातून चोरट्यांनी रोख ७० हजार रुपयांसह सोने-चांदीचे दागिने असा एकूण एक लाख ७५ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विजयादशमी सणाच्या दिवशी सुरेश जगताप हे खोटे नगर परिसरात रावण दहन पाहण्यासाठी तर त्यांच्या पत्नी व मुले अन्य ठिकाणी गेले होते. त्यामुळे घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी घरातून रोख ७० हजार रुपये, १३ ग्रॅम वजनाचे सोन्याच्या वेगवेगळ्या दागिन्यांसह चांदीचे दागिने असा एकूण १ लाख ७५ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. पत्नी व मुले घरी आले त्या वेळी हा प्रकार लक्षात आला. त्यांनी याविषयी पतीला कळविले.
या संदर्भात शुक्रवारी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि विजय पाटील करीत आहेत.