“शावैम” येथे रक्तदात्यांसह संस्थांचा ‘सर कार्ल लँडस्टीनर’ पारितोषिक देऊन सन्मान
जळगाव (प्रतिनिधी) : रक्तदान ही काळाची गरज बनली असून रक्ताच्या निर्मितीला अद्यापही मानवाला पर्याय निर्माण करता आलेला नाही. शरीरात रक्तनिर्मितीस चालना मिळते. रक्त कधी आणि कोणाला लागेल, याची खात्री देता येत नाही. त्यामुळे रक्तदानाबद्दल नियमित जनजागृती करुन रक्तदान चळवळीला सर्वांनीच हातभार लावण्याची गरज आहे. गोरगरीब रुग्णांना शासकीय रुग्णालय उपचारांसाठी मोठा आधार असून त्यांच्यासाठी रक्तदान करण्यासाठी आमच्या रक्तपेढीत यावे, असे प्रतिपादन अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी केले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे राष्ट्रीय स्वैच्छिक रक्तदान दिवस विकृतीशास्त्र विभागातर्फे (पॅथॉलॉजी) उत्साहाने साजरी करण्यात आला. यावेळी रक्तदान करणाऱ्या व रक्तदानासाठी सहकार्य करणाऱ्या सामाजिक संस्थांचा, व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात अध्यक्षस्थानी अधिष्ठाता डॉ गिरीश ठाकूर उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून उपअधिष्ठाता डॉ. मारोती पोटे व डॉ. रमेश वासनिक, वैद्यकीय अधीक्षक डॉ धर्मेंद्र पाटील, विभागप्रमुख डॉ. दीपक शेजवळ, डॉ. योगिता बावस्कर, डॉ. शीतल लाड उपस्थित होते. सुरुवातीला दीप प्रज्वलनाने व तसेच रक्त गटाचे संशोधक ‘सर कार्ल लँडस्टीनर’ यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यासोबतच ‘राष्ट्रीय स्वैच्छिक रक्तदान दिवस’ निमित्त भित्तिपत्रक फलकाचे प्रमुख उपस्थितांनी अनावरण केले.
प्रस्तावनेत, कार्यक्रमामागील भूमिका डॉ. दिपक शेजवळ यांनी विशद केली. उपअधिष्ठाता डॉ मारोती पोटे व वैद्यकिय अधीक्षक डॉ धर्मेंद्र पाटील यांनी उपस्थितांना रक्तदानाविषयी माहिती दिली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल गोरगरीब, गरजू रुग्णांचे हित लक्षात घेता जास्तीत जास्त लोकानी स्वैच्छिक रक्तदान करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात ३० स्वैच्छिक रक्तदाता व विविध संस्थांचा, रक्तदान शिबीर आयोजक यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. या सर्वांना पहिल्यांदाच, रक्तगटाचे संशोधक ‘सर कार्ल लँडस्टीनर’ यांचे नावे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमात, जवळपास १०० पेक्षा जास्त वेळा रक्तदान करून विक्रम नोंदवणारे रक्तदाता मुकुंद गोसावी यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षीय भाषणात, डॉ. गिरीश ठाकूर यांनी स्वैच्छिक रक्तदान हेच सर्व श्रेष्ठदान याची जाणीव आपल्या मार्गदर्शनातून सर्व उपस्थितांना करून दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. श्रद्धा गायगोळ व लक्ष्मीकांत त्रिपाठी यांनी केले.आभार प्रदर्शन राजेश शिरसाठ यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. भरत बोरोले, डॉ. कुणाल देवरे, रक्तपेढी प्रमुख सहायक प्रा. डॉ. कविता पाटील, डॉ. अनघा आमले, डॉ. निलेश पाटील, डॉ. हर्षदा पाडवी, डॉ. मधुवंती लांडगे, डॉ. अवनी पांडे, डॉ. श्रद्धा दैठणकर, डॉ. मिनू वर्गीस, डॉ. शाल्मली नावडे, डॉ. भावेश खडके, डॉ. राहुल पाटील, डॉ. विद्या शिरसाठ, रक्तपेढीचे पीआरओ प्रदीप पाडवी यांनी परिश्रम घेतले.