अमळनेर पोलीस स्टेशनची कारवाई
पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना गोपनीय माहिती मिळाली की, मिळचाळ परिसरात चारचाकी वाहन क्रमांक एम एच ५४, डी १८७९ मध्ये अवैध रित्या गॅस भरला जात आहे. त्यांनी तातडीने पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड, भूषण परदेशी, सुमित वानखेडे तसेच तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षण अधिकारी रुकसाना शेख, पुरवठा निरीक्षक सचिन निकम यांना छापा टाकण्यास पाठवले. पथक घटनास्थळी पोहचताच त्यांना एका अल्पवयीन मुलाच्या दुकानावर गौरव हरी चौगुले (रा.मिळचाळ), जितेंद्र रवींद्र उदेवाल (रा. गुरुकृपा कॉलनी) हे तिघे जण इलेक्ट्रिक पंपाच्या साहाय्याने घरगुती वापराच्या गॅस सिलिंडर मधून वाहन क्रमांक (एम एच ५४ डी १८७९) मध्ये गॅस भरताना आढळून आले.
पोलिसांनी दोघा तरुणांना अटक करून अल्पवयीन मुलाला नोटीस देऊन सोडण्यात आले. त्यांच्याकडून दोन भारत गॅस व दोन एचपीगॅस असे ४ सिंलिंडर, इलेक्ट्रिक पंप आणि ५ लाख रुपयांची चारचाकी असा एकूण ५ लाख १९ हजार ६६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. भूषण परदेशी याच्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायदा कलम ३ व ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड करीत आहेत.