गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे महात्मा गांधीजींची जयंती उत्साहात साजरी
जळगाव (प्रतिनिधी) : महात्मा गांधी यांचे संपूर्ण जीवन आलौकीक होते. गांधीजींनी तीन तत्वांचा जीवनात आंगीकार केला. त्या तत्वांवरच संपूर्ण जगाला अंहिसेचा मंत्र मिळाला. केवळ उद्योगातच नव्हे तर समाजकारण, राजकारण आणि दैनंदिन जीवनात महात्मा गांधीजींनी नावीन्यतेला (इनोव्हेशन) महत्त्व दिले. प्रत्येक विषयांवर त्यांनी सखोल चितंन केले. मतभेदांवरही ते खुलेपणाने चर्चा करत होते. दुसऱ्यास बदलण्याऐवजी त्यांनी स्वत:मध्ये बदल केला. जसे धागेधागे विणून वस्त्र तयार होते त्याचप्रमाणे माणसांमाणसांना जोडून देश बनतो, असे विचार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रमुख पाहुणे म्हणून व्यक्त केले.
गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे गुरुवारी विश्व अहिंसा दिवस, चरखा जयंती, राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त अंहिसा सद्भावना शांती रॅलीचे आयोजन केले होते. यावेळी व्यासपीठावर खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्हि. एल. माहेश्वरी, मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, राजेंद्र मयूर, डॉ.सुदर्शन अयंगार, अनिल जैन, ज्योती जैन, गीता धर्मपाल, अंबिका जैन या मान्यवरांची उपस्थिती होती. त्याप्रमाणे या रॅलीत अतुल जैन, डॉ. भावना जैन, जैन परिवारातील सदस्य, अनिश शहा, शिरीष बर्वे यांच्यासह जैन इरिगेशन सिस्टम्स लि., गांधी रिसर्च फाऊंडेशन गांधी तीर्थचे सहकारी, अनुभूती निवासी आणि इंग्लीश मीडियम स्कूलचे विद्यार्थी तसेच शहरातील इतर शाळांचे विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.
जिल्हाधिकारी आयुषप्रसाद म्हणाले की, महात्मा गांधी यांनी सर्वव्यापी विचार मांडले आहेत. एक व्यक्ती एखाद्या क्षेत्रातच पारंगत असतो, परंतु महात्मा गांधी हे अनेक विषय आणि क्षेत्रात पारंगत होते. सर्वच क्षेत्रात आपले योगदान दिले. दुसऱ्यांना बदलण्यापूर्वी स्वत:मध्ये ते बदल घडवत होते. महात्मा गांधी यांच्यापूर्वी ज्या ज्या क्रांती झाल्या. परंतु केवळ महात्मा गांधींजी यांनीच अंहिसेच्या माध्यमातून क्रांती घडवली. अहिंसेनेच त्यांनी जगात बदल घडवून आणला. गांधीजींचे विचार आपण आपल्या जीवनात अवलंबू या, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात शास्त्री टॉवर चौकात लालबहादूर शास्त्री यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन झाली. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी हिरवा झेंडा दाखवून शांती रॅलीची सुरुवात केली. त्यानंतर या रॅलीचा समारोप महात्मा गांधी उद्यानात झाला. तेथील गांधीजींच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. व्यासपीठावरदेखील दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
गांधी उद्यानातील कार्यक्रमास प्रारंभी सर्वधर्मप्रार्थना झाली. त्यानंतर अनुभूती इंटरनॅशनल रेसीडेन्सीच्या विद्यार्थांनी ‘वैष्णव जन तो तेने कही ये…’ भजन सादर केले. प्रास्तविक गांधी रिसर्च फाउंडेशनचे सहकारी आश्विन झाला यांनी केले. त्यात त्यांनी गांधी रिसर्च फाउंडेशन करत असलेल्या कार्याची माहिती दिली. गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. सुदर्शन आयंगार यांनी उपस्थितांना अंहिसेची शपथ दिली. सूत्रसंचालन गिरीश कुळकर्णी यांनी केले तर आभारप्रदर्शन चंद्रशेखर पाटील यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.
देशभक्ती समूहगीत स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके
गांधी तीर्थ देशभक्ती समूहगीत गायन स्पर्धा ३० सप्टेंबर रोजी झाल्या होत्या. त्याचा निकाल आणि पारितोषिक वितरण आज झाले. शहरी विभागातून 13 व ग्रामीण भागातील 8 एकूण 21 संघांनी सहभाग घेतला होता. पहिल्या तीन विजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरवण्यात आले. त्यात शहरी भागातून केशव स्मृती प्रतिष्ठान संचलित ब. गो. शानभाग विद्यालय (प्रथम), अनुभूती इंटरनॅशनल स्कूल (निवासी) (द्वितीय), विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लीश मीडियम स्कूल, वाघनगर (तृतीय) आणि उत्तेजनार्थ ओरियान इंग्लीश मीडियम स्कूल आणि पोदार स्कूलला मिळाले. ग्रामीण भागातून एल.एच.पाटील इंग्लीश मीडियम स्कूल, वावडदा (प्रथम), महात्मा गांधी विद्यायल, भादली (द्वितीय) आणि तृतीय स्वा. प.ध.थेपडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, म्हसावद तर उत्तेजनार्थ आदर्श विद्यालय, कानळदा यांना देण्यात आले.
महात्मा गांधी, अब्दुल कलाम यांच्या रुपात चिमुकले
सद्भावना शांती यात्रेत भारतातील थोर पुरुषांची व्यक्तीरेखा अनुभूती इंग्लीश मीडियम स्कूलच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी साकारली होती. ते रॅलीचे आकर्षण ठरले. त्यात युग नाथोने (लालबहादूर शास्त्री), आर्यन इंगळे (महात्मा गांधी), आराध्या पाटील (झाशीची राणी), कार्तिक मराठे (ए.पी.जे.अब्दुल कलाम), रोहन शेवाळे (पंडित नेहरु), इशानी चौधरी (इंदिरा गांधी), तेजस हटकर (नेताजी सुभाषचंद्र बोस) अशा विविध भूमिका साकारल्या होत्या.
फोटो ओळी- अंहिसा सद्भावना रॅलीला हिरवा झेंडा दाखवताना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद शेजारी कुलगुरु डॉ.व्ही.एल.माहेश्वरी, खा.स्मिता वाघ, अशोक जैन, ज्ञानेश्वर ढेरे, राजेंद्र मयूर, मिनल करनवाल, ज्योती जैन, डॉ.भावना जैन, अतुल जैन, शिरीष बर्वे, अनिश शहा आदी मान्यवर.